जेंव्हा हरवलेली बायको सापडते पलंगाखाली...

555.jpg
555.jpg


तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) : पहाटेपासून बायको घरी नसल्यामुळे नवऱ्याने पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली आणि हरवलेली बायको दुपारी घरीच बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची घटना तामसा येथे बुधवारी (ता. २७) घडली आहे. या अकल्पनीय व चर्वितचर्वण प्रकारच्या घटनेबाबतच्या घटना-घडामोडी येथील होळीगल्ली परिसर व तामसा पोलिस ठाण्यामध्ये घडल्या आहेत. या बाबत पोलिस ठाण्यात नवऱ्याने केलेल्या तक्रारीवरून मिसिंगचा गुन्हा नोंद झाला.


येथील होळीगल्लीमधील आयुर्वेदिक दवाखाना परिसरातील एक वर्षापूर्वी विवाह झालेली विवाहिता बुधवारी (ता. २७) पहाटेपासून घरी दिसत नसल्यामुळे नवऱ्यासह सासरवाडी हादरली. सासरवाडीच्या लोकांनी सूनबाईचा परिसरात शोधाशोध चालू केला. कोणताच ठावठिकाणा लागत नसून कोणतीच माहिती मिळात नसल्यामुळे सासरवाडीचे लोक घाबरले. लगेच हा प्रकार सूनबाईच्या माहेरी कळविण्यात आला व माहेरची मंडळी एका तासात तामसा येथे दाखल झाले. आमची मुलगी कुठे ? अशी काळजीपूर्वक चौकशी संतापलेल्या माहेरच्या मंडळींनी चालू केली. यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या दोन्ही बाजूंनी वाढत गेल्या.


सूनबाई पलंगाखाली बेशुद्धावस्थेत 
दरम्यानच्या काळात सूनबाईचा शोध शहराच्या परिसरात चालू झाला. तिने एखादे टोकाचे पाऊल उचलण्याची भीती वाढत गेली. यामुळे दोन्ही बाजूंमध्ये ताणतणाव वाढला. प्रकरण दुपारी पोलिस ठाण्यात गेले. सूनबाईच्या माहेरची मंडळी अत्यंत आक्रमक झाली होती. तिचे वडील व इतर नातेवाइक संतापले होते. मुलगी कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्यामुळे गोंधळ व संशयकल्लोळ वाढत गेला. घटनास्थळ परिसरात चर्चेला उधाण आले. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रीतसर कार्यवाही चालू केली. दुपारी दोनच्या सुमारास पोलिस ठाण्यात नवऱ्याच्या तक्रारीवरून बायकोचा मिसिंगचा गुन्हा नोंद झाला. गुन्हा नोंद होताच सूनबाई सासरवाडीत पलंगाखाली बेशुद्धावस्थेत असल्याची बातमी पोलिस ठाण्यात धडकली. 


आश्चर्यकारक व संशयास्पद प्रकार
बातमी ऐकून तिचे आई-वडील व इतर नातेवाईक ताबडतोब शहरातील भररस्त्यावरून आक्रमक अवस्थेत धावत तिच्या घराकडे गेले. या वेळी घरात जाऊन बघताच सगळ्यांनाच धक्का बसला. सूनबाई पलंगाखाली बेशुद्धावस्थेत आढळली. ती पहाटेपासून तिथे होती तर हे घरातील लोकांना दिसले का नसावे? सासरवाडीच्या लोकांनी शोध घेण्यात गफलत केली का? असे प्रश्न समोर येत आहेत. या बाबतच्या सर्व घटना घडामोडी बुचकळ्यात टाकणाऱ्या व गूढ निर्माण करणाऱ्या आहेत. बेशुद्धावस्थेतील सूनबाईला ताबडतोब माहेरच्या मंडळींनी उपचारासाठी हदगाव येथे नेले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे म्हणाले, बेशुद्धावस्थेतील महिला शुद्धीवर आल्यानंतर तिच्याकडूनच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. पण मिसिंगचा गुन्हा नोंद होताच हरवलेली महिला स्वतःच्या घरी बेशुद्धावस्थेत सापडण्याचा आश्चर्यकारक व संशयास्पद प्रकार यानिमित्त समोर आला आहे. पुढील तपास जमादार जानकर हे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com