नांदेडच्या बावरीनगर येथील अशोक स्तंभाचे काम पूर्णत्वाकडे, अॅनलाईन धम्म परिषदेच्या तयारीला वेग

लक्ष्मीकांत मुळे
Tuesday, 26 January 2021

मध्यप्रदेशातून मागविण्यात आलेल्या लाल दगडापासून हा स्तंभ शिल्पकलेत प्रावीण्य असलेले राजस्थान राज्यातून आलेले कारागीर यांचेकडून निर्माण कार्य करण्यात येत आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड) : महाविहार बावरीनगर दाभड  येथे उभारण्यात येणार्‍या अशोक स्तंभाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहे. पूर्णाकार घेतल्यावर ६५ फुट उंचीचे हे अशोक स्तंभ कदाचित ‘जगातील सर्वात उंच अशोक स्तंभ’अशी आपली ओळख प्रस्थापित करेल. मध्यप्रदेशातून मागविण्यात आलेल्या लाल दगडापासून हा स्तंभ शिल्पकलेत प्रावीण्य असलेले राजस्थान राज्यातून आलेले कारागीर यांचेकडून निर्माण कार्य करण्यात येत आहे.  

महाविहार बावरीनगर दाभड, नांदेड हे तीर्थक्षेत्र नांदेड- भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर नांदेडपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. महाविहार बावरीनगर दाभड (जि. नांदेड) हे दक्षिण भारतातील समाज प्रबोधनाचे प्रभावी धम्मक्षेत्र म्हणून नावारुपास आलेले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने अबाल- वृद्ध, महिला- पुरुष अगाध श्रद्धेने महाविहार बावरीनगर या पवित्र धम्म क्षेत्रास भेट देत असतात. 

शासन निर्णय ता.  २७ जुलै २००९ अन्वये महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड या क्षेत्र विकासासाठी नकाशे व अंदाजपत्रक २५ कोटी या रक्कमेसह प्रशासकीय मान्यता यापूर्वीच प्रदान करण्यात आलेली आहे.  

या प्रशासकीय मान्यताप्राप्त अंदाजपत्रकात ध्यान केंद्र, बहुद्देशीय सभागृह, भिक्खु व भिक्खुनी निवास, श्रामणेर व अंगारक निवास, श्रामणेरी व अंगारीका निवास, भोजन कक्ष व डॉरमेटरी अशोक स्तंभ, संरक्षक भिंत व अंतर्गत रस्ते या बाबींचा समावेश आहे.   

ता.  दोन व तीन जानेवारी १९८८ रोजी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धम्माचे भाष्यकार पूजनीय भदंत डॉ. आनंद कौसल्यायन महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली बावरीनगर येथे महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी पहिली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित केली होती. त्या धम्म परिषदेचे उद्घाटन थायलंडचे बुद्धगया येथील तत्कालीन लॉर्ड अबोट डॉ. धम्म वीराना वत्त महाथेरो यांच्या हस्ते संपन्न झाले होते. या धर्मपरिषदेत कल्याण मित्र विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांचे विपश्यनेवर प्रदीर्घ प्रवचन झाले होते. त्याही धम्मपरिषदेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तेव्हापासून दरवर्षी ‘दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे’अविरतपणे आयोजन करण्यात येते. देश विदेशातून पाचारण करण्यात येणार्‍या विद्वान भिक्खूंकडून धम्मदेसना ग्रहण करण्यासाठी लाखोंच्या संख्येत श्रद्धावान उपासक- उपसिका येथे येत असतात. 

याही वर्षी पौष पौर्णिमेला म्हणजेच ता. २८ व २९ जानेवारी २०२१ रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद ( आॅनलाईन ) आयोजित करण्यात आलेली आहे. ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था, मुळावा’चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे. 

येथील पूर्णावस्थेत आलेला अशोक स्तंभ पाहण्यास महाविहार बावरीनगर येथे नागरिकांची गर्दी उसळत आहे. निर्विवादपणे बावरीनगर येथील हा महाकाय अशोक स्तंभ नांदेडसाठी निश्चितपणे एक नवीन ओळख निर्माण करुन देईल. यापूर्वीच जागतिक पातळीवर नोंदवल्या गेलेल्या तथा महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांच्या सम्यक सकल्पनेतील महाविहार बावरीनगर लवकरच साकार होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on Ashoka Pillar at Bavrinagar in Nanded nearing completion, speeding up preparations for Online Dhamma Parishad nanded news