मांजरा नदीवर येसगीला ९७ कोटींचा नवीन पुल होणार

अभय कुळकजाईकर
Thursday, 2 July 2020

नांदेड जिल्ह्यात मांजरा नदीवर महाराष्ट्र आणि तेलंगणाला जोडणारा येसगी येथे नवीन पूल बांधण्यात येणार असून त्यास शासनाची तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून हे काम मार्गी लागणार आहे.

नांदेड - तेलंगणा व महाराष्ट्राला जोडणारा येसगी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील अस्तित्त्वात असलेला जुना पुल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी सुमारे ९७ कोटी रूपयांचा नवीन पुल बांधण्याच्या प्रस्तावास राज्याच्या बांधकाम विभागाला केंद्र शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असून या नवीन पुलाच्या निर्मितीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.

नांदेड जिल्ह्यातील रेणापूर - आष्टा मोड - उदगीर - देगलूर - आदमपूर फाटा - खतगाव - सगरोळी - येसगी या ६३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील व पूर्वीच्या नरसी - बिलोली ते तेलंगणा सीमा प्रमुख राज्य मार्ग दोन राज्य सीमेवरील येसगी येथील मांजरा नदीवर १९८५ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलाचे उद्‍घाटन तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. टी. रामराव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. या पुलामुळे दोन राज्यांना नव्हे तर दोन संस्कृतीला जोडण्याचे काम झाले असल्याचे गौरोद्‍गार या दोन ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळेस काढले होते. 

हेही वाचा - संत नामदेव महाराज पालखीला परवानगी नाकारली- भाविकांमधून नाराजी
 

पुल वाहतुकीसाठी धोकादायक
मागील पाच वर्षांपासून भाजपा सरकारच्या काळात या पुलाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्याचबरोबर जड वाहनांची वाहतुकही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यातून या पुलाचे नुकसान झाले. त्यामुळे या पुलाची मजबुती तपासण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले. या तपासणी अहवालात हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे तज्ञांनी अहवाल दिला. या अहवालानुसार राज्य सरकारने या संबंधात तत्काळ कारवाई करण्यास सुरूवात केली. 

नवीन पूल बांधकामास तत्त्वतः मान्यता
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून महामार्ग क्रमांक ६३ वरील हा पुल पाडून या ठिकाणी नवीन पुल बांधण्यासाठी सुमारे ९७ कोटी रूपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला. पुलाची असलेली गरज व सद्यस्थितीतील धोकादायक पुल या बाबी लक्षात घेऊन सरकारने नवीन पूल बांधकामास तत्त्वतः मान्यता दिली आहे.

हेही वाचलेच पाहिजे - Video - नांदेडात भाजपने केली वीज बिलाची होळी

दीड ते दोन वर्षात बांधकाम पूर्ण होणार
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात येणारे प्रस्तावित पुलाचे बांधकाम दीड ते दोन वर्षात पूर्ण होणार असून या पुलाची एकूण लांबी ही आठशे मीटर राहणार आहे. उच्चस्तरीय दर्जाचा हा पुल बांधल्यानंतर महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांची वाहतूक सुलभ होणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yesgi will have a new bridge worth Rs 97 crore on Manjra river, Nanded news