एका तिकिटात दोन प्रेमकथा (नवा चित्रपट-फिलौरी)

phillauri
phillauri

अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्यानंतर अनुष्का शर्माने निर्माती होणे पसंत केले. अत्यंत कमी वयात तिने हे एक प्रकारचे धाडस केले आणि तिथेही ती यशस्वी झाली. आज ती आपल्या भावाबरोबर चित्रपट निर्मिती करतेय. "फिलौरी' हा तिचा निर्माती म्हणून दुसरा चित्रपट आहे. दिग्दर्शक अंशय लाल याला घेऊन तिने हा चित्रपट आणला आहे. एक वेगळ्या प्रकारची कथा आणि त्या कथेला चांगली दिलेली ट्रिटमेंट, स्पेशल इफेक्‍ट्‌सचा पुरेपूर वापर... अशा काही गोष्टी या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहेत. या चित्रपटाच्या कथेला पंजाबची पार्श्‍वभूमी लाभली आहे. साहजिकच पुन्हा एकदा तुम्हाला पंजाबची सफर केलेली दिसणार आहे. कथेला सुरुवात होते ती परदेशातून आलेल्या कनन (सूरज शर्मा) याच्यापासून. तो भारतात आपली लहानपणापासूनची मैत्रीण अनुशी (मेहरिन पिरजादा) लग्न करण्यासाठी येतो. त्यांच्या घरची मंडळीही हे लग्न व्हावे याच विचाराचे असतात आणि साखरपुड्याचा दिवस निश्‍चित केला जातो; परंतु कननला मंगळ असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या घरची मंडळी कननचे पहिल्यांदा लग्न एका पिंपळाच्या झाडाशी लावतात आणि तिथेच कथानकाला कलाटणी मिळते. कारण याच झाडावर शशी (अनुष्का शर्मा) नावाचे भूत राहात असते आणि हेच झाड लग्न लागल्यानंतर कापून टाकले जाते. मग या भुताचा आत्मा इकडे-तिकडे फिरत असतो. तो थेट कननच्या घरात शिरतो. ते भूत केवळ कननलाच दिसत असते. हे भूत कननशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्याला पाहिल्यानंतर कननची घाबरगुंडी उडते. तो सैरभैर होतो. त्याबाबतीत तो कुणाला काहीही सांगत नाही. मात्र त्याचे मन विचलित झालेले असते. त्यातून तो कसा बाहेर पडतो... शशी नावाचे भूत नेमके काय करते... ते भूत का बनलेले असते याचीच कथा म्हणजे "फिलौरी' हा चित्रपट. दिग्दर्शक अंशय लालचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि त्याने आपल्यातील दिग्दर्शकीय कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या त्या भूमिकांसाठी कलाकारांची त्याने अचूक निवड केली आहे आणि स्पेशल इफेक्‍ट्‌सचा वापर अगदी प्रभावीपणे केला आहे. एकाच चित्रपटात दोन प्रेमकथा त्याने योग्य पद्धतीने बांधल्या आहेत. कलाकारांच्या अभिनयाबाबत बोलायचे झाले तर अनुष्का शर्मासह सर्वच कलाकारांनी फुल ऑन बॅटिंग केली आहे; परंतु अधिक कौतुक करावे लागेल ते "लाईफ ऑफ पाय'फेम अभिनेता सूरज शर्माचे. त्याने अभिनयाचे चौकार-षटकार चांगलेच लगावले आहेत. भूत दिसल्यानंतर त्याच्या मनाचा उडणारा थरकाप त्याने चेहऱ्यावर छान दाखवला आहे. पंजाबी सुपरस्टार दिलजित दोसांझने गायक आणि कवीची भूमिका साकारली आहे. मुळात तो पंजाबमध्ये गायक आणि कलाकार म्हणून लोकप्रिय आहे. या चित्रपटात त्याने गाणेही गायले आहे आणि सहजसुंदर अभिनय केला आहे. अनुष्का शर्माबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. तिचा अभिनय दिवसेंदिवस खुलतोय. समोर एखादा मेगास्टार असो किंवा नवोदित कलाकार... तिच्या अभिनयाची कळी नेहमीच खुललेली असते. या चित्रपटातही तिची कामगिरी उजवी झालेली आहे. शाश्‍वत सचदेव आणि जसलिन रॉयल यांनी या चित्रपटाला दिलेले संगीत पाहता त्यांना पैकीच्या पैकी गुण द्यावेच लागतील. खास पंजाबी टच असलेले हे संगीत झकासच. या चित्रपटाची कथा गाण्यांमधूनच पुढे सरकत आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. विशाल सिन्हा यांची सिनेमॅटोग्राफी बोलकी वाटते. मात्र चित्रपट काहीसा संथ झालेला वाटतो. पूर्वार्धात ही कथा झपाझप जात नाही. शिवाय वरकरणी चित्रपटाची कथा चांगली वाटत असली तरी अतार्किक वाटते. कारण आजच्या संगणक युगात मंगळ आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाशी लग्न... अशा काही रूढी-परंपरा अजूनही आहेत आणि लोक मानतात याचं आश्‍चर्य वाटते. तरीही अनुष्का आणि तिच्या टीमने चांगला प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची कथा मांडताना विनोदनिर्मितीही केली आहे. एक रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com