Navratri Festival 2019 : रॉकेट वूमन!

Ritu-Karidhal
Ritu-Karidhal

ती नारी, वनिता, जाया, सुनन्दा, जनी, मनुजी, पुरन्ध्री, ललना, प्रमदा, वनिता... ती दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती... ती पत्नी, माता, भगिनी, कन्या, सखी, सहचरी, सचिव... अनेक नावे तिची. अनेक रूपे तिची; पण रूप कोणतेही असो, ती असते शक्तिमयी आणि शक्तिदायिनीही. काळ कोणताही असो, स्त्री नावाचे एक शक्तिपीठ नेहमीच जागृत असते समाजात. अशाच काही आधुनिक शक्तिपीठांचा, समाजाला आपल्या कर्तृत्वाने बळ देणाऱ्या, तमाम स्त्रियांसमोर आपल्या प्रतिभेचा, यशाचा आदर्श घालून देणाऱ्या स्त्रियांचा खास नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्ताने खास परिचय...

६ सप्टेंबरची रात्र. संपूर्ण देश जागा होता त्या रात्री. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या पडद्यावरून ‘इस्रो’च्या मुख्यालयातील एकेक हालचाल डोळ्यांत प्राण आणून टिपत होता. प्रसंगच तसा ऐतिहासिक होता. भारताचे चांद्रयान आज चंद्राच्या भूमीवर उतरणार होते... त्या अत्यंत नाट्यमय, थरारक घडामोडींच्या केंद्रस्थानी होती एक वैज्ञानिक. इस्रोच्या ‘कमांड सेंटर’ची सर्व धुरा ती मोठ्या कौशल्याने सांभाळत होती... त्यांचे नाव रितू करिधल. चांद्रयान- २ च्या मिशन डायरेक्‍टर. त्या मंगळयान मोहिमेच्या (मार्स ऑर्बिटर मिशन) च्या उपसंचालकही होत्या. लखनौ विद्यापीठातून पदवीधर झालेल्या रितू यांनी नेहमीची मळलेली वाट सोडून अवकाशसंशोधनाचा ध्यास घेतला. लहानपणापासूनच अवकाशाला गवसणी घालण्याचा ध्यास होता त्यांचा. विज्ञान हा आवडीचा विषय होता. अवकाशातील चंद्राबद्दल मनात कमालीचे कुतुहल होते. त्यातूनच त्यांनी पदवीनंतर इस्रोत प्रवेश केला आणि आज आपल्या ज्ञान आणि कष्टाच्या बळावर त्यांची स्वतःची ओळख तयार झाली आहे. 

२००७ मध्ये ‘मिसाईल मॅन’ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट हा पुरस्कार मिळविणारी ही महिला आज भारताची रॉकेट वूमन म्हणून ओळखली जात आहे. असंख्य विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श म्हणून आज हे आधुनिक शक्तिपीठ उभे आहे...

मुली शहरातील असतील वा खेड्यातील, त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा पाठिंबा असेल, तर त्या कोणतेही यश प्राप्त करू शकतात. ही भावना सर्वांच्या मनात रुजवली पाहिजे.
- रितू करिधल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com