
यंदा मागील वर्षापेक्षा घागरा व दागिन्यांचे भाव वाढले आहेत. ‘जीएसटी’चा फटका यंदा नवरात्रोत्सवावरही झाला आहे. युवतींमध्ये राजस्थानी बांधणी पॅटर्नच्या घागऱ्यांची क्रेझ दिसून येत आहे.
- प्रल्हाद शामनाणी, विक्रेता
जळगाव - नवरात्रोत्सवामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गरबा- दांडिया खेळण्यासाठी लागणारे रंगबिरंगी व चमकदार घागरे, दागिने, दांडिया आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. गरबा खेळताना गुजराथी, राजस्थानी, मणिपुरी पेहराव केला जात असल्याने मैदानावर वेगळीच रंगसंगती अनुभवास मिळते. तरुणींमध्ये घागरा, चोली तर तरुणांमध्ये कुर्ता, पायजमा असा पेहराव असतो. यंदा या घागऱ्यांमध्ये डबल घेरदार, काचेचे, कवड्यांचे गोंडा असलेले घागरे सर्वाधिक पाहावयास मिळत आहे.
राजस्थानी घागऱ्यांचे आकर्षण
गरबा म्हटला, की घागऱ्याला विशेष महत्त्व येते. घागऱ्याचे हेच वेगळेपण या दिवसात महिलांना आकर्षित करून घेते. शहरात खास राजस्थान पॅटर्नच्या घागऱ्यांची दुकाने चौकाचौकात सजली आहेत. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, तरुणींना हे राजस्थानी घागरे आकर्षित करीत आहेत.
डिझाइनवर विशेष भर
घागऱ्याचे विविध प्रकार असून, प्रत्येक जण आपआपल्या पसंतीला प्राधान्य देतात. रंगसंगती सोबतच घागऱ्यावरील डिझाइनदेखील भाव खाऊन जात आहे. आकर्षक डिझाइनमुळे यंदा घागऱ्याचे भावदेखील वाढले आहेत. साधारणत: दोनशे रुपयांपासून तर हजार रुपयांपर्यंत भाड्याने घाघरे मिळत आहे.
दागिन्यांची भुरळ
गरबा, दांडियाच्या या पोशाखासोबत महिलांची आदिवासी दागिन्यांना पसंती आहे. प्रामुख्याने जाड कंगन, गळ्यात लहान व मोठ्या स्वरूपातील माळा, रंगबिरंगी माळ, जाड साखळी, बाजुबंद, बिंदी, मोठे कानातले यांचा समावेश आहे. यंदा हे दागिने शंभर रुपयांपासून तर चारशे रुपयांपर्यंत भाड्याने मिळत आहे. तर १ हजारांपासून ३ हजारांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे.
रंगबिरंगी लायटिंगच्या दांडिया
महाराष्ट्रात रंगबिरंगी दांडिया सर्वाधिक पसंत आहेत. यात लाकडी, ॲल्युमिनिअम, स्टीलच्या दांडियांसोबत यंदा एलईडी लायटिंगच्या दांडिया विक्रीस आहेत. या दांडिया हातात घेतल्यानंतर त्यात लाइट लागतो. अडीचशे ते तीनशे रुपयांना मिळणाऱ्या या दांडिया तरुणाईला आकर्षित करत आहेत. अहमदाबाद, राजकोट, बडोदा येथून दांडिया आणल्या जातात.
मुलांची कुर्त्यांना पसंती
पुरुषांसाठीच्या ‘गरबा केडिया ड्रेस’च्या किमती आठशे रुपयांपासून १ हजार ५०० रुपयांपर्यंत आहेत. लहान मुलांसाठी देखील आकर्षक रंगसंगतीतले लहानखुरे ड्रेस लक्ष वेधून घेत आहेत. सध्या मुलांमध्ये कुर्त्यांना अधिक मागणी असल्यामुळे ‘गरबा स्पेशल कुर्त्यांनी’ दुकानांमध्ये मोक्याची जागा पकडली आहे. सहाशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत किमती असलेल्या या डिझायनर कुर्त्यांना तरुण विशेष पसंती देत आहेत.