जगदंबेचा उदे उदे...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 September 2017

जळगाव - गरबा- दांडियाचा रंग भरणारा नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. भवानीमातेचा जयजयकार... जगदंबेचा उदे उदे... करीत दुर्गोत्सव मंडळांनी मिरवणुकीद्वारे, लेझीमची प्रात्यक्षिके सादर करीत दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यामुळे शहरात चैतन्यमय वातावरण होते.

जळगाव - गरबा- दांडियाचा रंग भरणारा नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. भवानीमातेचा जयजयकार... जगदंबेचा उदे उदे... करीत दुर्गोत्सव मंडळांनी मिरवणुकीद्वारे, लेझीमची प्रात्यक्षिके सादर करीत दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. यामुळे शहरात चैतन्यमय वातावरण होते.

घटस्थापना असल्याने बाजारात सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते. आज दिवसभर मुहूर्त असल्याने सायंकाळी उशिरापर्यंतही घटस्थापना व देवीच्या प्रतिष्ठापना सुरू होती, तसेच बाजारात देवीच्या मूर्तीसोबतच शृंगार व पूजासाहित्य खरेदीसाठी टॉवर चौक, सुभाष चौक, गांधी मार्केट परिसरासह प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी होती. हातगाड्या व दुकानांवर पूजासाहित्य उपलब्ध होते. 

देवीच्या स्थापनेसाठी हळद, कुंकू, गुलालासोबतच देवीचा साज, चुनरी, मंगळसूत्र, ओटीचे साहित्य, सप्तधान्य, नाडा, हिरवा चुडा, जोडवे, नथ तसेच, केळीचे घड, पाने, विड्याची पाने विक्रीसाठी हातगाड्यांवर उपलब्ध होती. यासोबतच घरोघरी ‘घट’ बसविले जात असल्याने देवीच्या छोट्या मूर्ती, कोऱ्या टोपल्या, माठ, वाण खरेदीसाठी बाजारात महिलांची गर्दी होती.

भाविकांची गर्दी
नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांच्या उपवासाला आजपासून सुरवात झाली. यात नवरात्रोत्सवात पहिली माळ असल्याने शहरातील विविध देवी मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी व खणा- नारळाची ‘ओटी’ भरण्यासाठी महिलांची गर्दी होती. अनेकांनी पूजा करून हिरव्या बांगड्यांचा चुडाही चढविला.

सीडी, साउंड सिस्टिम घेण्यासाठी लगबग
नवरात्रोत्सवात पुढचे सर्व दिवस गरबा- दांडिया रंगणार आहे. यासाठी देवीच्या भक्तिगीतांसोबत दांडिया- गरबाच्या ध्वनिफिती घेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. तसेच बाजारात स्टॉलदेखील लावण्यात आले होते. नवरात्रोत्सवाच्या तयारीत शहरातील मोठ्या मंडळांचे, देखावे, आरास, रोषणाईचे काम पूर्णत्वास आले असून, गल्लीबोळात बालगोपाळांसह तरुणही तयारीत व्यस्त झाले आहेत. शिवाय, देवीच्या समोर गरबा खेळण्यासाठीचे ‘रिंगण’ तयार करण्यात आले. यासाठी साउंड सिस्टिमसोबत दांडिया खेळण्यासाठी टिपऱ्या घेण्यासाठीही लगबग होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news navratrotsav