Navratri 2022: नवदुर्गेतील दुसरी दुर्गा ‘मुक्तांबिका’ गजेंद्रलक्ष्मी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

muktambika devi in kolhapur

Navratri 2022: नवदुर्गेतील दुसरी दुर्गा ‘मुक्तांबिका’ गजेंद्रलक्ष्मी

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोल्हापुरात सर्वात महत्त्वाची आणि तितकीच प्राचीन गोष्ट म्हणजे  करवीरनगरीच्या वेशीबाहेर असणाऱ्या ‘नवदुर्गा’. आता वाढलेल्या शहरामुळे या नवदुर्गा आपल्याला शहराच्या मध्यावरच पाहायला मिळतात, पण पूर्वी त्या तशा नव्हत्या. या नवदुर्गा शहराच्या बाजूने वसल्या आहेत. या नवदुर्गांचे दर्शन घेताना आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणाही पूर्ण होते. आज या नवदुर्गांपैकी दुसरी म्हणजेच मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) मातेबद्दल जाणून घेऊया...

कोल्हापुरात मंगळवार पेठेतील शाहु मैदान परिसरात साठमारीच्या मैदानामागे एका कौलारू घरात नवदुर्गेतील दुसरी मुक्तांबिका देवीचे मंदिर आहे. आद्यगुरू शंकराचार्य महाराज यांची ही उपास्य देवता मानली जाते. या देवीला गजेंद्रलक्ष्मीही म्हटले जाते. अतिशय प्राचिन आणि पुरातन असे हे मंदिर आहे. संस्थान काळात या मंदिराला विशेष महत्त्व होते.

हेही वाचा: Navratri 2022: देवीला तांबुला का वाहतात?

या मंदिराशेजारी असलेल्या साठमारी मैदानात हत्तीचा साठमारीचा खेळ रंगायचा. त्यामुळे हे या गजेंद्रलक्ष्मीमातेच्या मंदिराजवळ हत्तीसाठीचे मैदान असणे हा दैवी योगायोग मानला जातो. चैत्र महिन्यात जोतिबा यात्रेनंतर तिसऱ्या दिवशी या गजेंद्रलक्ष्मी मातेचा रथोत्सव पार पाडला जायचा. विशेष म्हणजे, हा रथ हत्ती ओढायचे. हा रथोत्सव आता होत नसला तरी आजही दिनदर्शिकेत याचा उल्लेख आढळतो. 

हेही वाचा: Navratri 2022: श्री एकवीरा देवी अमरावती मंदिराचा थोडक्यात इतिहास..

गजेंद्रलक्ष्मी देवीची मुर्ती दिड हात उंचीची काळ्या पाषानाची चतूरभुज बैठी मुर्ती आहे. अखंड पाषाणातील असून तिच्या हातात बिल्वफळ आणि त्रिशुळ आहे. आदिशक्ती आणि भगवान शंकर अशा दोन्ही शक्तींचा समन्वय साधलेला आहे. या देवीच्या मुर्तीवर गज म्हणजे हत्ती मस्तकावर चवऱ्या धरल्या आहेत.  या आहेत नवदुर्गाकोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनाबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.