Navratri 2022: नवरात्रीत उपवास का करावा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri 2022

Navratri 2022: नवरात्रीत उपवास का करावा?

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

नवरात्री मध्ये रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य ह्यांची रेलचेल असतेच, सोबतच ही वेळ आपली विश्रांतीची, आपल्या अंतरंगात वळण्याची आणि आपल्या आत नवी उर्जा भरून घेण्याची आहे. नवरात्रीच्या काळात उपवास केल्यास आपल्या आतील परमानंद आणि प्रसन्नतेकडे नेणारा प्रवास सुकर होतो. ह्यामुळे मनाची अस्वस्थता दूर होऊन सजगता आणि आनंद वाढू लागतो.

आयुर्वेदानुसार उपवासामुळे आपला जठराग्नी पुन्हा प्रज्वलित होतो. ह्या जठराग्नीतील वाढ आपल्या शरीरातील टाकाऊ विषकण नष्ट करते. हे टाकाऊ विषकण शरीराच्या बाहेर घालविले जातात, त्यामुळे सुस्ती आणि मंदपणा कमी होतो. शरीरातील पेशीपेशीत नवचैतन्य जागृत होते. त्यामुळेच, उपवास हा शरीरशुद्धीसाठी प्रभावी उपचार ठरलेला आहे. जेव्हा शरीर शुद्ध होते, तेव्हा मन सुद्धा अधिक शांत आणि स्थिर होते, कारण शरीर आणि मनाचा गहिरा संबंध आहे.बहुदा, आपल्यापैकी बरेच लोक भूक लागण्याची वाटच बघत नाही. 

भूक लागणे म्हणजे आपले शरीर अन्न पचविण्यासाठी आता सज्ज आहे हे दर्शविण्याचा त्याचा मार्ग आहे. भूक लागण्यापूर्वीच खाल्ल्यामुळे आपली पाचनप्रणाली अजून दुबळी होते, परिणामी ताण वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मंदावते. उपवासाने आपला जठराग्नी अजून प्रदीप्त होत असल्यामुळे, तणाव कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.नवरात्रीचा काळ हा स्वतःसोबत घालविण्याचा, ध्यानाचा आणि आपल्या अस्तित्वाच्या स्त्रोतासोबत जोडून घेण्याचा काळ आहे. उपवासामुळे मनाची अस्वस्थता कमी होते आणि आपल्या अंतरंगाकडे वळत गहिऱ्या ध्यानात उतरणे सोपे जाते. तथापि, स्वतःला पुरेशी उर्जा मिळत राहावी म्हणून पुरेसा फलाहार आणि सात्विक अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे.

सात्विक उर्जेचा लाभ घ्यावा. उपवास आणि ध्यान केल्याने आपल्यातील सत्व वाढते. सत्व म्हणजे आपल्यातील शांती आणि प्रसन्नतेची गुणवत्ता. ह्या सात्विक उर्जेत वाढ झाल्याने आपले मन अधिक शांत आणि सजग होते. परिणामी, आपले संकल्प आणि प्रार्थना अधिक प्रबळ होतात. सत्वाच्या तजेल्याने शरीर अधिक हलकेफुलके आणि उर्जावान बनते. आपण अधिक कार्यक्षम होतो. त्याचे फळ म्हणजे, आपल्या इच्छा साकार होऊ लागतात आणि आपली सर्व कार्ये सहजपणे सिद्धीस जातात.