Navratri Festival 2019 : शास्त्रीय संगीतातील माहितीचं जतन (व्हिडिओ)

नीला शर्मा
Monday, 7 October 2019

आगळीवेगळी संगीतसेवा
डेक्कन परिसरातील रानडे वृत्तपत्र व संज्ञापन संस्थेजवळच्या जागेतून दुसऱ्या ठिकाणी राधिका राहायला गेली. ही मोक्‍याची जागा विकली किंवा भाडेकरूंना दिली असती तर भरपूर पैसे मिळाले असते. मात्र, ‘जयपूर घराना गुणीजनखाना’साठी तिनं ही सदनिका अर्पण केली. इथं वर्षातून तीन-चारदा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून, विद्यार्थी व रसिकांना जयपूर घराण्यातील मागील पिढीच्या गायकांच्या ध्वनिमुद्रित अंशांच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण माहितीची मेजवानी अनुभवता येते.

भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराणं हे तुलनेनं अलीकडचं. पण आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेलं. विदुषी किशोरी आमोणकरांमुळे तर याची ख्याती दाही दिशांना पसरलेली. या घराण्याच्या आरंभापासून आजपर्यंतच्या कलावंतांच्या माहितीचं जतन करण्याचं शिवधनुष्य याच घराण्यातील युवा गायिका डॉ. राधिका जोशी-राय हिनं पेललं आहे.

किशोरीताईंचे शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्याकडे जयपूर घराण्याच्या गायकीचं शिक्षण राधिका गेली १४ वर्षं घेत आहे. तिनं एम. कॉम केलं आहे आणि तेही बोस्टनमधील टफ्ट्‌स विद्यापीठातून.

ती म्हणाली, ‘‘तिथल्या वास्तव्यात मी पाश्‍चात्त्य रसिकांनी भारतीय शास्त्रीय संगीत कसं ऐकावं, या संगीतातील उत्स्फूर्तता, एकाच रागाची दरवेळी वेगळी मांडणी कशी असते, त्यातील सौंदर्यस्थळं कशी ओळखावीत, दाद कुठं व कशी द्यावी, यासाठी कार्यशाळा घेत असायचे. तेव्हा मला खूप प्रश्‍न विचारले जात. त्यातून माझ्या लक्षात आलं, की आपली विद्या ही गुरुमुखी आहे. प्रत्यक्ष शिकवण्यातून गाण्याचे बारकावे कळतील तेवढेच. पण, हिच्यातील सैद्धांतिक भागही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला पाहिजे. यासाठी दस्तऐवजीकरण महत्त्वाचं. अनेक थोर कलावंत गाऊन गेलेत किंवा शिकवून गेलेत; त्यातलं सगळंच लिखित अथवा ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध नाही. मग जे जे मिळवता येईल, ते जास्तीत जास्त मिळवून अभ्यासकांसाठी, रसिकांसाठी ठेवूया. यातून मी ‘जयपूर घराना गुणीजनखाना’ या संग्रहण व जतन करण्यासाठीच्या केंद्राची निर्मिती केली.’

ज्यांच्यामुळे जयपूर घराणं वेगळं म्हणून ओळखलं जातं ते उस्ताद अल्लादिया खाँसाहेब, मोगूबाई कुर्डीकर, किशोरीताई अशा दिग्गजांकडून निरनिराळ्या ठिकाणी सादर झालेल्या मैफलींबद्दलची माहिती, त्यांनी गायलेले राग व बंदिशी, लेखन, ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती, जाहिरातपत्रकं, पुस्तकं, टिपणं, छायाचित्रं असं बरंच काही गुणीजनखान्यात उपलब्ध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 classical music information