esakal | Navratri Festival 2019 : घागरा-चोली ‘रेंट’ने घेण्याचा ‘ट्रेंड’
sakal

बोलून बातमी शोधा

ghagara-choli-trends

यांना आहे मागणी...
 पारंपरिक कच्छी काम,  मिरर वर्क,   गोंडा वर्क, 
  थ्रेड वर्क,   डबल लेअर घागरा,    गर्ल केडिया,  इंडो वेस्टर्न घागरा,   गुजराती पेहराव

Navratri Festival 2019 : घागरा-चोली ‘रेंट’ने घेण्याचा ‘ट्रेंड’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरवात झालीये... त्याबरोबरच सुरू झाल्यात दांडिया नाइट्‌स... या प्रत्येक ठिकाणी जायचं म्हटलं तर रोज वेगळा ड्रेस तर हवाच... पण नऊ दिवसांचे नऊ ड्रेस घेणं खिशाला परवडणारं नाही, म्हणूनच गरबा किंवा दांडियासाठी आवश्‍यक घागरा-चोली आणि केडिया ड्रेस ‘रेंट’ने घेण्याचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून सोसायट्यांबरोबरच खासगी कंपन्यांसह आयटी कार्यालयांमध्ये दांडिया नाइटचं आयोजन केलं जातं, त्यासाठी आपल्या कलेक्‍शनमध्ये एक तरी घागरा-चोली असावं असं अनेक युवतींना वाटतं, त्यामुळे एक घागरा विकत घेऊन काही  घागरे भाड्याने घेण्याकडे त्यांचा कल आहे. 

घागऱ्यावर ऑक्‍साईड ज्वेलरी घातल्याशिवाय लुक पूर्ण होतच नाही, त्यामुळे ऑक्‍साईड आणि चंदेरी दागिन्यांची मोठी व्हरायटी बाजारात उपलब्ध आहे, जी विकत आणि भाड्यानेही घेता येऊ शकते. ड्रेस आणि दागिन्यांच्या ‘कॉम्बो’चा रेंट अडीचशे ते दोन हजारांपर्यंत आहे. लहान बाळापासून मोठ्यांपर्यंत सर्व  वयोगटांसाठी हे ड्रेस उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पारंपरिक कच्छी काम, मिरर वर्क, गोंडा वर्क, थ्रेड वर्क यांसारख्या १५ ते २० व्हरायटी पाहायला मिळतात, त्याचबरोबर ‘पद्मावत’ चित्रपटानंतर आलेल्या डबल लेअर घागऱ्यालाही तरुणींची पसंती मिळत आहे. मुलांसाठी असणाऱ्या केडिया ड्रेसमध्ये बदल  करून बाजारात यंदा प्रथमच ‘गर्ल केडिया’ ही नवी व्हरायटी आली आहे. या हटके कॉम्बिनेशनलाही मागणी असल्याचं विक्रेते योगेन मेहता यांनी सांगितलं. 

घागरा आणि केडियाचं बुकिंग गणपतीनंतर लगेचच सुरू होतं. नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस विकत घेणारे ग्राहक आधीच आपले ड्रेस बुक करून ठेवत असल्याचं मेहता यांनी सांगितलं. अनेकदा एखाद्या ग्रुपला गरबा स्पर्धेसाठी हटके लुक हवा असतो, त्यामध्ये इंडो वेस्टर्न घागऱ्यासारखे प्रकारही खरेदी केले जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

नवरात्रोत्सवात घातल्या जाणाऱ्या घागरा-चोलीमध्ये असंख्य प्रकार आहेत, मात्र ते सर्वच खरेदी करणं शक्‍य होत नाही. त्यामुळे एखादा ड्रेस विकत घेऊन इतर ‘रेंट’ने घेणं परवडत असल्याचं सविना शहा या तरुणीने सांगितलं. दरवर्षी कार्यालयामध्ये नवरात्रीत ‘ट्रॅडिशनल डे’चं आयोजन केलं जात. त्यासाठी गुजराती पेहराव थीम असल्यानं दरवर्षी वेगळा घागरा-चोली रेंटने घेत असल्याचं सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या निवेदितानं सांगितलं.  

नेहमीच जीन्ससारख्या कॅज्युअल ड्रेसमध्ये वावरणारे तरुण ही सणांच्या दिवसांत पारंपरिक वेशभूषा करताना दिसून येतात. मग, या सणासाठी शॉपिंगही ओघानेच आली. पण, नवरात्रोत्सवानिमित्ताने घागरा-चोली आणि केडिया विकत घेण्यापेक्षा ‘रेंट’ने घेण्याचा सध्या ट्रेंड लोकप्रिय झाल्याचं दिसत आहे.

यांना आहे मागणी...
 पारंपरिक कच्छी काम,  मिरर वर्क,   गोंडा वर्क, 
  थ्रेड वर्क,   डबल लेअर घागरा,    गर्ल केडिया,  इंडो वेस्टर्न घागरा,   गुजराती पेहराव