
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (रविवारी) अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा जागर होणार असून देवी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. रात्री साडेनऊला या सोहळ्याला प्रारंभ होईल.
कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महालक्ष्मी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज (रविवारी) अष्टमीनिमित्त श्री अंबाबाईचा जागर होणार असून देवी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. रात्री साडेनऊला या सोहळ्याला प्रारंभ होईल.
मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी झाली. दुपारी गर्दी कमी राहिली. मात्र, सायंकाळी चारनंतर पुन्हा गर्दी वाढली. ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांच्यासह धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. रात्री साडेनऊ वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा झाला. मंदिरातील दोन्ही वैद्यकीय मदत केंद्रात आजअखेर तीन हजारहून अधिक भाविकांनी तपासणी व औषधोपचार घेतले.
‘महालक्ष्मी’ पूजेविषयी...
आदी शंकराचार्यांनी रचलेल्या कनकधारा स्तोत्रांमधून अंबाबाईची करुणा भाकली आहे. या स्तोत्रामध्ये त्यांनी लक्ष्मीलाच कधी सरस्वती, तर कधी पार्वती मानले आहे. कनकधारा म्हणजे सोन्याचा वर्षाव. जिचा निवास कमळ असून, जिने हातामध्ये कमळ धारण केले आहे. जिने लखलखीत वस्त्रे आणि पुष्पमाला परिधान केल्या आहेत. जिने हरी म्हणजे विष्णूचे मन जिंकले आहे, अशी ती त्रिभुवनाला सांभाळणारी लक्ष्मी माझ्यावरही प्रसन्न होऊ दे, असे या पूजेचे महात्म्य असल्याचे श्रीपूजक मंदार मुनीश्वर, आशुतोष ठाणेकर, केदार मुनीश्वर यांनी सांगितले.
प्रतिभा थोरात यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रसिद्ध गायिका प्रतिभा थोरात यांच्या ‘भावभक्ती स्वरबहार’ या मैफलीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासह संग्राम पाटील यांनी मैफलीतून विविध भाव-भक्तिगीते सादर केली. प्रिया लांजेकर यांचे निवेदन, तर अमित कुलकर्णी, सुरेश कदम, राजू चौंडकर, प्रफुल्ल शेंडगे यांची संगीत साथ होती.
ऑनलाईन दर्शन ४० लाखांवर
देवस्थान समितीच्या अंबाबाई दर्शन लाईव्ह ॲपच्या माध्यमातून सात दिवसांत ४० लाखांहून अधिक जणांनी ऑनलाईन दर्शन घेतले.