
घरोघरीही घटस्थापना
नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरीही घटस्थापनेची तयारी झाली आहे. आठ दिवस सर्वजण याच उत्सवाच्या तयारीत होते. अनेकांनी आपापली घरे स्वच्छ करून आंब्याच्या पानांची तोरणेही तयार केली होती. रविवारी घटस्थापनेला अनेकांच्या दाराला ही तोरणं लागणार आहेत. देव्हाऱ्यासमोर घट मांडताना माळा व पापड्यांचा फुलोरा अडकविण्यासाठी मंडपही आंब्याच्या पानांनी सजविण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद - तुळजापूर, माहूर आणि अंबाजोगाई येथील देवीच्या शक्तिपीठांसह मराठवाड्यातील देवीच्या अन्य मंदिरांमध्ये रविवारपासून (ता. २९) नवरात्रोत्सव सुरू होत आहे. घटस्थापनेनंतर दसऱ्यापर्यंत सर्वत्र उदोकार सुरू होईल. विविध कार्यक्रमांची भाविकांसाठी पर्वणी असेल. त्याशिवाय ठिकठिकाणी गरबा-दांडिया रंग भरेल.
तुळजापूरनगरी सज्ज
तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवासाठी तुळजापूरनगरी सज्ज झाली आहे. रविवारी (ता. २९) दुपारी बाराला मंदिरात घटस्थापना होईल. त्यानंतर रोज विविध धार्मिक व अन्य कार्यक्रमांची पर्वणी असेल.
शहरासह तुळजाभवानी मंदिरात नवरात्राची तयारी पूर्ण झाली आहे. तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता पूर्ण झाली आहे. मंदिरात शेजघरातील निद्रिस्त मूर्ती शनिवारी (ता. २८) मध्यरात्रीनंतर एकला सिंहासनावर अधिष्ठित करण्यात येईल. त्यानंतर देवीचे नित्य अभिषेक होतील. पहाटे सहाला नित्य अभिषेक झाल्यानंतर दुपारी बाराला घटस्थापना होईल.
मंदिरात भाविकांना आजपासून घाटशीळमार्गे प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे. महाद्वारातून प्रवेश आता बंद करण्यात आला आहे. घाटशीळ मार्गावर दर्शन पासचे २७ काउंटर सुरू करण्यात आले आहेत. घाटशीळ रस्त्यावर दर्शन मंडपाच्या शेडजवळ क्लॉक रूम, पाणपोयी, प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आजच दाखल झाले आहेत. पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव पंधरा दिवसांचा असतो. सहा ऑक्टोबरला दुर्गाष्टमी, सातला महानवमी, आठला तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन, तेराला कोजागरी पौर्णिमा हे यात्रेतील महत्त्वाचे दिवस आहेत. नवरात्रोत्सवात रोज अभिषेक, पूजा, आरती, छबिना मिरवणुकीसह विशेष पूजाही बांधल्या जातील.
प्रक्षाळ पूजेसाठी असा प्रवेश
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत प्रक्षाळ पूजेसाठी स्थानिक नागरिकांना आधारकार्ड दाखवून राजे शहाजी महाद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे, असे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.
माहूरला संगीतमय कार्यक्रम
माहूर - महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. ‘आई राजा उदो, उदो... बोल भवानी की जय’च्या जयघोषात, वेदमंत्रोच्चारात रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास श्री रेणुकादेवीची घटस्थापना होईल. नऊ दिवस गडावर दोन सत्रांमध्ये नामवंत कलावंतांचे भक्तिसंगीताचे कार्यक्रम रंगतील. त्यात भक्तिसंगीत, भजन, कीर्तन, भारूड, सनईवादन, गोंधळ आदींचा समावेश असेल.
तोरणांनी मंदिर सजले
अंबाजोगाई - येथील योगेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सकाळी दहाला घटस्थापना होणार आहे. मंडप व आंब्याच्या तोरणांनी मंदिर परिसर सजला आहे.
अंबाजोगाईकरांची ग्रामदेवता व कोकणास्थांची कुलदेवता असलेल्या योगेश्वरीचे दोन नवरात्रोत्सव साजरे होतात. त्यात अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव हा दसरा उत्सव म्हणून साजरा होतो, तर मार्गशीर्ष महिन्यात या देवीचा मुख्य नवरात्रोत्सव साजरा होतो. रविवारी सुरू होणाऱ्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, सकाळी देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष रुईकर व कमल रुईकर यांच्या हस्ते महापूजा होईल. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मंदिराच्या मुख्य सभामंडपात हा विधी होणार आहे. घटस्थापनेच्या कार्यक्रमास सर्व विश्वस्त, मानकरी व भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवल समितीने केले आहे.