
ब्लॉक प्रिटिंगमधील वेगळं काही
सायली म्हणाली, ‘ब्लॉक प्रिंटिंगमधले विविध प्रकार कमालीचे लोकप्रिय झाले आहेत. त्यातही इंडिगो या प्रकारच्या वस्त्रांबद्दलचं माझं स्वतःचं निरीक्षण असं, की हे हिवाळ्यात उबदार व उन्हाळ्यात थंड असतात. यासाठी वापरलेलं सूत आणि रंगांची ही किमया असेल की काय, याचा अभ्यास करावासा वाटतो.
आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असलेल्या सायली गुर्जर या तरुणीला पारंपरिक सुती कापडांपासून फॅशनेबल ड्रेस डिझायनिंगचा छंद जडला. बघता बघता याचं तिनं लघुउद्योगात रूपांतर करत झोकदार भरारी घेतली. ड्रेस मटेरिअल म्हणून कापडावर स्वतः ब्लॉक प्रिंटिंग करणं, ते इतरांना शिकवणं असा तिनं व्यवसायाचा केलेला विस्तारही कौतुकास्पद आहे.
‘मॅड कट्टा’ अशा हटके नावाने ड्रेस डिझायनिंगचा स्टुडिओ दिसला, की लोकांचं कुतूहल जागृत झाल्याशिवाय राहत नाही. आत गेल्यावर ब्लॉक प्रिटिंगची कार्यशाळा दिसल्यावर आपलं कुतूहल वाढतं. सायली एकावेळी एकीलाच शिकवत असते. या कलेकडे गांभीर्याने पाहण्याची तिची दृष्टी यातून लक्षात येते.
सायली म्हणाली, ‘‘ब्लॉक प्रिंटिंग ही भारतातील पुरातन कला आहे. निरनिराळ्या आकाराचे ठसे बनवून, ते रंगात बुडवून कापडावर ठसवले जातात. मी राजस्थानमधील बगरू या गावी जाऊन हे शिकले. कच्छकडील अजरक, कर्नाटकमधील कलमकारी, इकत अशा हाताने छपाई केलेल्या कापडांनी मला मोहून घेतल्यामुळे मी यात ओढली गेले. दहा वर्षे केलेलं आर्किटेक्टची प्रॅक्टिस सोडून मी यातल्या प्रयोगात रमू लागले.’’
सायलीने सांगितलं, की माझी आई आणि तिचीही आई कपडे शिवण्यात तरबेज होत्या. मी ते पाहत मोठी झाले. ती काही जणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिवणकाम शिकवायची. मलाही तिच्यासारखं करावंसं वाटायचं. मी आठवीत असताना माझ्या थोरल्या बहिणीला जुळं झालं, तेव्हा मीच बाळंतविडा तयार केला होता. पुढे मी आर्किटेक्ट झाले तरी ड्रेस डिझायनिंगची आवड होतीच. लग्नानंतर सासूबाईंनाही कपड्यांची आवड जोपासताना पाहिलं. त्या आणि मी मिळून प्रांतोप्रांतीच्या पारंपरिक कलात्मक सुती साडीविक्रीचा व्यवसाय करतो. कात्रज-आंबेगाव परिसरात घरातूनच हा व्यवसाय चालवतो. मी तयार केलेले टॉप्स, प्लॉजो, जाकिटं तिथेच विक्रीला ठेवले आहेत. कर्वेनगरमध्ये माझा डिझायनिंग स्टुडिओ आहे. इथंच मी ब्लॉक प्रिंटिंग करते आणि शिकवते. ड्रेस शिवताना त्याला शोभणाऱ्या छोट्या बॅग्ज, पाऊचसुद्धा मी तयार करते. एवढंच नाही तर योग्य असे दागिनेही बनवते.’