Shardiya Navratri 2022 : जाणून घ्या घटस्थापनेचा संपुर्ण विधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardiya Navratri 2022

Shardiya Navratri 2022 : जाणून घ्या घटस्थापनेचा संपुर्ण विधी

Shardiya Navratri 2022 : अश्विन शुद्ध प्रतिपदा सोमवारी (ता. 26) घरोघरी आपल्या कुलस्वामिनीच आमगम म्हणजेच घटस्थापना होणार आहे. आपल्या कुलदेवीची घटस्थापना आपल्या घराण्याच्या प्रथेनुसार व परंपरेनुसार मोठ्या भक्तीभावाने सर्वत्र केली जाते. देवीचे आगमन व स्थापन पुजन शास्त्रोक्त पद्धतीने कसे करावे याची संपुर्ण माहिती आपण जाणून घेवूया. यासाठी हा लेख पुर्ण वाचा.

(Shardiya Navratri 2022 Know the complete ritual of Ghatsthapana)

शारदीय नवरात्रोत्सवात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या त्रिशक्तींबरोबर दुर्गा देवीसह आपल्या कुलस्वामिनीची पुजा करण्याची प्रथा अनेक कुटुंबांत असते. या घटस्थापनेवेळी पुजाविधी करतांना कुलाचारांना प्राधान्य असते. प्रत्येक कुटुंबात आपल्या प्रथा-परंपरेनुसार कुलदेवीचा शेंदुराचा तांदळा किंवा देवीचा टाक, मुर्ती स्वरूपात देवीची स्थापना केली जाते व आपल्या परंपरे नुसार अष्टमी, नवमी अथवा दसऱ्याला कुळाचार व्रत केले जाते.

हेही वाचा: Navratri 2022 : या 4 अंगांनी करा नवरात्रीचे पुजन, देवीची सदैव कृपादृष्टी राहील

घटस्थापना पूजेचा संपुर्ण विधी जाणून घ्या

नवरात्री उत्सवात देवीची विधीव्रत घटस्थापना कशी करावी याबद्दल धर्म अभ्यासक नरेंद्र धारणे सांगतात, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घरात अत्यंत शुचिर्भूत अशा जागी घटस्थापना करावी. सर्वप्रथम घराच्या मुख्य दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. घराच्या याच मुख्य प्रवेशद्वारामार्गे देवीचे आगमन आपल्या घरात होते. नवीन रेशमी वस्त्र नेसून पूजेसाठी पाटावर बसावे. तेलवात घातलेली समई, धूप- अगरबत्ती प्रज्वलित करून स्वतःच्या कपाळी कुंकुवाचा टिळा लावून पूजेला आरंभ करावा.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

यामंत्राने सर्वप्रथम गणेशाचे स्मरण करावे. त्यानंतर एका तांब्याच्या कलशावर ताम्हण ठेवावे, या ताम्हणात गहू किंवा तांदूळ ठेवावे. त्यात मुख्य देवता महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांसह कुलस्वामीनीची प्रतिमा, टाक असेल त्याची स्थापना करावी. यासह देव्हाऱ्यातील देवतांची स्थापना करावी. त्याचबरोबर दुसरा तांब्याचा कलश शुद्ध पाण्याने भरून त्यात सुगंधी द्रव्ये, सव्वा रुपया व सुपारी टाकावी. त्या कलशाच्या मुखावर पाच आंब्याची पाने ठेवून त्यावर मध्यभागी नारळ ठेवावे. या कलशाच्या पायथ्याशी एका परडीत माती टाकून त्यामध्ये नऊ प्रकारची धान्ये (टाकावी) पेरावी.

हेही वाचा: Navratri : तुम्हाला नवरात्र व्रताचे प्रकार माहीत आहे का? जाणून घ्या शास्त्रीय महत्व

या पेरलेल्या धान्यावर रोज पाणी शिंपडावे. ते छोटेसे शेत फुलून आले की घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते अशी कल्पना आहे. याच हेतूने घटस्थापनेवेळी हे धान्य रुजत घालतात. याच्या एका बाजूला घंटा, दुसऱ्या बाजूला शंख ठेवावे व मधोमध निरांजन प्रज्वलित करावी. देवीसमोर आपल्या कुळातील परंपरेनुसार अखंड नंदादीप, दिवा, समई पेटत ठेवतात. तसे आपल्या परंपरेनुसारे असेल त्याप्रमाणे दीप प्रज्वलन करावे. दिव्याच्या ज्योतीतून निघालेला प्रकाश हे देवीच्या तेजाचे प्रतीक आहे, देवीच्या शक्तीचे स्वरूप आहे, अशी मान्यता आहे. कलशाला पुष्पहार घालून कलशावर झेंडूच्या फुलांची माळ सोडावी. यालाच मालाबंधन असे म्हणतात. नवरात्रीच्या काळाता या मालाबंधनाला विशेष महत्व आहे. यानंतर देवीला आपल्या कुळातील परंपरेनुसार तयार केलेला नैवेद्य अर्पण करुन आरती करुन देवीचे या मंत्रांद्वारे स्मरण करावे.

हेही वाचा: Navratri 2022: जोगवा का मागितला जातो ?

1) सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।

2) नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।

नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मताम्॥

अशाप्रकारे देवीची घटस्थापना पुर्ण होते. देवीच्या आगमनाने नवरात्रीच्या नऊ दिवसात घरातील वातवरणात चैन्यन निर्माण होते. या प्रमाणे देवीची घटस्थापना करावी व दररोज देवीची मनोभावे पुजा अर्चा, नैवेद्य आरती करावी. यामुळे देवी प्रसन्न होऊन सदैव तिची कृपा दृष्टी आपल्या परिवारावर राहील.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022: नवरात्रीत जवसाची पेरणी का केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि कारणे