esakal | Video : सेनेगलमध्येही 'बाप्पा मोरया'चा जयघोष 
sakal

बोलून बातमी शोधा

senagal-ganesh-fesivale

पश्‍चिम आफ्रिकन देश सेनेगलची राजधानी दकार येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी "गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात वाजतगाजत 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली. 

Video : सेनेगलमध्येही 'बाप्पा मोरया'चा जयघोष 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डकार (सेनेगल) : पश्‍चिम आफ्रिकन देश सेनेगलची राजधानी दकार येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सात वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या श्री गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी "गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात वाजतगाजत 'श्रीं'ची प्रतिष्ठापना केली.

यंदा गणेशोत्सवानिमित्त मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ नित्यपूजा, आरती होत असते. सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसाद आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात. सेनेगलमध्ये नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असणारे भारतीय बांधव मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी होतात. सेनेगलमधील भारताचे राजदूत जी. श्रीनिवास यांनीही सहकुटुंब "श्रीं'चे दर्शन घेऊन श्री गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 

भारतापासून तब्बल 15 हजार किलोमीटर दूर असणाऱ्या या आफ्रिकन देशात हजारो भारतीय नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. येथील मराठी बांधवांनी 2012 पासून येथे गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा उत्सव स्थानिक नागरिकांसाठीही कौतुक आणि आपुलकीचा सोहळा ठरत आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप देशमुख हे बारामतीचे असून दरवर्षी गणेशोत्सवासाठी 15 दिवस आधी मूर्ती पुण्यातून आणण्यात पुढाकार घेतात. केवळ मराठीच नव्हे तर पंजाबी, गुजराती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आदींचा या उपक्रमात आवर्जून सहभाग असतो. श्रीनिवास अमरापूरकर, चंदन पंडोरे, सागर देशमुख, संतोष दोरक, श्रीकांत पुजारी, स्वप्नील देशमुख, प्रज्ञेश गुरव, किरण घोडेकर, संदेश देशमुख, देवेश पाटकर, पवन नानोरे, अमर वाळके आदी कार्यकर्ते हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. 

मदतीचा हातही 
केवळ गणेशोत्सव म्हणून एकत्र येणे असा या मंडळाचा उद्देश नाही. येथील भारतीयांच्या मदतीला धावून जाणे हे या कार्यकर्त्यांना आद्य कर्तव्य वाटते. अचानक दुर्घटना झाल्यास त्याला लागणारी मदत, तातडीने भारतात जाण्यासाठी आवश्‍यक असलेले सहकार्य तसेच एखाद्याची नोकरी गेल्यासही त्याला हात देण्यास हे कार्यकर्ते आपुलकीने पुढे येतात.