अनुभव सातासमुद्रापारचे... : पूर्ण ‘लॉकडाउन’ नाही, तरी...

आराधिता चक्रवर्ती, जपान
आराधिता चक्रवर्ती, जपान

जपानी माणूस एरवीही स्वच्छतेची काळजी घेत असतात. साध्या सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर जपानी माणसाकडे सॅनिटायझर व टिश्यू पेपर असतो. जपानी माणूस घरातून बाहेर पडतो तो मास्क लावूनच.

कोरोनाच्या भयंकराची जाणीव जपानमध्येही आहे. पण येथील नागरिकात मुळातच स्वयंशिस्त व अलिप्तता आहे. येथील संस्कृतीत आत्मीयता व्यक्त करतानाही शारीरिक अंतर राखण्यावरच भर आहे. त्यामुळे जगभर चाललेला ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नारा येथे काही विशेष वाटत नाही. त्यामुळेच कदाचित येथे अजूनही पूर्ण ‘लॉकडाउन’ करण्यात आलेले नाही. येथे सध्या कार्यालयांमध्ये येण्याची सक्ती नाहीच, किंबहुना कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याला प्रोत्साहन देत आहेत. मी आणि माझे पती पुनीत गेले महिनाभर ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहोत. पण बहुतेक जपानी कार्यालयात जाणेच पसंत करतात. माझे बहुतेक जपानी सहकारी कार्यालयात ठरलेल्या वेळी जातात. घरी काम करण्याचा `फील` येत नाही, असे त्यांचे म्हणणे असते. पण त्यांना कोरोनाबाबत गांभीर्य नाही किंवा ते काही हलगर्जीपणा दाखवत आहेत असा याचा अर्थ नव्हे. ते स्वच्छतेची काळजी एरवीही घेत असतात.

एरवीही साध्या सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर जपानी माणसाकडे सॅनिटायझर व टिश्यू पेपर असतो. आताच नव्हे तर, एरवीही बाराही महिने जपानी माणूस घरातून बाहेर पडतो तो मास्क लावूनच. रेल्वे प्रवासातही ते गरजेशिवाय कोणाशी बोलत नाहीत. चौकात गप्पांची कोंडाळी जमली आहेत किंवा कोणी मोबाईलवर गप्पा करीत रस्त्यातच उभा राहिलाय, असे चित्र येथे दिसत नाही. ही कायमची शिस्त आहे. या अलिप्तपणामुळेच त्यांना पूर्ण लॉकडाउनची गरज अजून वाटत नसावी.

भीतीची छाया येथे जाणवते आहे, पण त्यामुळे घबराट माजलेली नाही. टोकियो वगळता इतरत्र कोरोनाचा त्रासही कमी आहे. जपानी माणसाला सायंकाळी रेस्टॉंरंटमध्ये जाणे खूप आवडते. त्यावरच बंधन आल्यामुळे तो वैतागला आहे.

सार्वजनिक कार्यक्रम पूर्ण बंद झाले आहेत. सरकारने बंधने घालण्याऐवजी समाजानेच स्वतःवर निर्बंध घालून घेतले आहेत, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. मी एक दिवसाआड बाहेर जाऊन आवश्यक ते सामान घेऊन येते आहे. भारतीय वस्तू अजून मिळत आहेत. त्या आणण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडते आहे. पूर्णतः घरात कोंडून घेतले तर मानसिक आजार जडावेल अशी भीती वाटते. भारतीय दूतावासाकडून मिळणाऱ्या सूचना येथील भारतीय मंडळी फेसबुकद्वारे एकमेकांना पाठवत आहेत. आम्हा भारतीयांचा एकमेकांना खूप आधार आहे. तसेच, कोणत्याही प्रकारे ही साथ फैलावू नये यासाठी जपानी सरकारही शर्थीने प्रयत्न करते आहे. 

(शब्दांकन - संतोष शेणई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com