अनुभव सातासमुद्रापारचे... : संकटाची सकारात्मक बाजू

Aashish-Joshi
Aashish-Joshi

त्सुनामी, महापूर, महायुद्धे ही संकटे एखादा प्रांत किंवा काही देशांपुरती मर्यादित होती. त्यामुळे इतर देश त्यांना मदत करू शकले. पण एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर आलेले आणि वेगाने पसरणारे ‘कोरोना’ हे मानवजातीवरील अभूतपूर्व संकट म्हणावे लागेल. अमेरिकेसारखी महासत्ताही या विळख्यात घट्ट अडकली आहे.

आमच्या भागात, कॅलिफोर्निया राज्यात सध्या ‘शेल्टर इन प्लेस’ची ऑर्डर आहे. घरात थांबा, आवश्‍यक गरजांसाठीच बाहेर पडा, बाहेर पडलात तरी एकमेकांपासून सहा फूट अंतर ठेवूनच. हा आदेश नुकताच तीन मेपर्यंत वाढविला आहे. फक्त अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. हॉटेलमध्ये फक्त पार्सलची सोय आहे, पण संसर्गाच्या भीतीने लोक बाहेरून अन्न आणणे टाळत आहेत. दुकानांमध्ये एका वेळी मोजक्‍याच लोकांना प्रवेश आहे.

गजबजणारे रस्ते ओस आहेत. ज्यांना शक्‍य आहे, त्यांचे घरून काम सुरू आहे. रोजंदारीवरील कामगारांना मात्र बिनपगारी घरी बसावे लागले आहे. 
अनेक लोकांनी साठवणूक केल्यामुळे काही गोष्टींचा तुटवडा आहे. घरपोच सेवांवरही ताण आहे. पूर्वी त्याच दिवशी डिलिव्हरी देणारे आता सातआठ दिवसानंतर सामान आणून देत आहेत. कोरोनाला तोंड देण्यासाठी अमेरिकी सरकार प्रयत्नशील आहे. फेस मास्क, व्हेंटिलेटरची तूट भरून काढण्यासाठी उपाय योजले आहेत. जनरल मोटर्ससारख्या कंपनीमध्ये सध्या पीपीई किटचे उत्पादन सुरू आहे. आर्थिक दुर्बल लोकांना मदत जाहीर केली आहे. गृहकर्जाचे हप्ते काही महिन्यांसाठी स्थगित केले आहेत. 

खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. गूगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्या देणग्या देत आहेत. गूगलने ‘व्हेरिली’ या जैववैज्ञानिक विभागातर्फे कोरोनाच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. शाळांना मोफत लॅपटॉप व इतर उपकरणे दिली जाणार आहेत.

ज्येष्ठांना वाणसामान आणून देणे, डॉक्‍टर- नर्ससाठी मास्क शिवून देणे, असे उपक्रम सुरू आहेत. मुलांना व्हिडिओ कॉलवर बोलावून गोष्टी वाचणे, खेळ घेणे अशा युक्‍त्या पालक लढवत आहेत. मोठेच नव्हे तर लहान मुलेही हस्तकलेच्या वस्तू तयार करून त्या विकून पैसे दान करत आहेत. काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. देशांतर्गत ताणतणाव विसरून मदत केली जात आहे. स्वातंत्र्याची किंमत लोकांना कळू लागली आहे. पृथ्वी फक्त आपलीच आहे, असा गैरसमज असणाऱ्या माणसाला प्राणी, पक्षी, झाडे दिसू लागली आहेत. कोण जाणे, अनेक वर्षांपासून सर्वांना पोसून दमलेल्या भूमातेसाठी कदाचित हा छोटासा हॉलिडे ब्रेक असेल..! 
(शब्दांकन - नयना निर्गुण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com