अनुभव सातासमुद्रापारचे... : शिस्तीला पर्याय नाही!

Shweta-Dolas
Shweta-Dolas

कोविड विषाणूचा झपाट्यानं प्रादुर्भाव होऊ लागल्यानंतर ब्रिटनच्या जनतेने एकी दाखवत, एकमेकांना मदत करत मानवतेची ज्योत तेवती ठेवली. ‘सी-ई-एफ-एच’चे म्हणजे कम्पॅशन (अनुकंपा), एम्पथी (सहभावना), फ्रेंडलीनेस (मित्रभावना) आणि ह्युमॅनिटी (मानवता) यांचे धागे संसर्गापेक्षा अधिक वेगाने जगभर विणले जातील, असा विश्‍वास आहे. 

सिंगापूर हा देश भारतातील एखाद्या मेट्रो सिटी एवढ्या आकाराचा. पिण्याच्या पाण्यासाठीही दुसऱ्या देशांवर अवलंबून असणारा हा देश केवळ कडक शिस्तीच्या जोरावर प्रगती साधू शकलेला आहे. हीच शिस्त आत्ताच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत उपयोगी पडते आहे. आर्थिक तोल ढळणार नाही, अशा प्रकारे येथील परिस्थिती हाताळली जात आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात कोरोनाने जेरीस आणलेले असताना सिंगापूरसारखा देश ज्या प्रकारे परिस्थिती हाताळतो आहे, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देखील कौतुक केले आहे. 

सिंगापूरसारख्या इवल्याशा देशात एक हजार हा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असला, तरी पुण्यामुंबईसारखी पूर्ण `सील` करण्याएवढी परिस्थिती येथे नाही. किंबहुना, पूर्ण लॉकडाउन असेही झालेले नाही. याचे कारण म्हणजे सरकारने योग्यवेळी घेतलेले निर्णय आणि त्याला नागरिक देत असलेला तात्काळ प्रतिसाद. माझा नवरा घरून काम करतो आहे, पण मी ठरावीक वेळ कामासाठी बाहेर जाते. अगदी मॉलमध्येही किती माणसे एका वेळी त्या इमारतीत असावीत, किती जण एखाद्या कक्षात असावेत, या विषयी काटेकोर सूचना देण्यात आल्या आहेत.  

सिंगापूरच्या नागरिकांना विमानाने परत आणले गेले. विमानतळाजवळची काही हॉटेल्स सरकारने ताब्यात घेतली आहेत. संशय नसलेल्या प्रवाशांना चौदा दिवसांसाठी या हॉटेलमध्ये ठेवले जाते. नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा पासपोर्ट तात्काळ रद्द केला जातो.  सिंगापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक गोष्टी आयात केल्या जातात. त्यातही मलेशिया आणि भारतातून अधिक प्रमाणात वस्तू येतात. त्यामुळे सध्या मुख्यतः भाज्या व खास भारतीय वस्तूंची कमतरता जाणवते. येथील मुख्य व्यवसाय असलेल्या पर्यटनाला कोरोनामुळे  खूप मोठा फटका बसला आहे. या व्यवसायांना काही निधी आणि सवलती सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

विलगीकरण झालेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यामागे प्रतिदिन शंभर डॉलर सरकारकडून कंपनीला दिले जातात. भारतात नुकतेच आरोग्यसेतू हे अँप्लिकेशन तयार केले गेले. सिंगापूरमध्ये गेल्याच महिन्यात ट्रेसर अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. 
(शब्दांकन - संतोष शेणई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com