esakal | β परदेशी मित्राची 38 वर्षांनी परदेशात भेट!

बोलून बातमी शोधा

friends
β परदेशी मित्राची 38 वर्षांनी परदेशात भेट!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

25 जुलै 1978 या दिवशी आग्रा येथे ताजमहाल परिसरात एका परदेशी मित्राची भेट झाली. त्यानंतर 27 ऑगस्ट 2016 रोजी त्यातील एका मित्रांच्या भेटीचा योग आला. तब्बल 40 वर्षांनंतर झालेल्या भेटीविषयी शांताराम बाबू वावरे महाविद्यालयातून नुकतेच निवृत्त झालेले प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी अमेरिकेतील शिकागो येथून पाठविलेला वृत्तांत - 

मी 40 वर्षांपूर्वी 19 सप्टेंबर 1976 रोजी सध्याच्या छत्तीसगड व पूर्वीच्या मध्यप्रदेशातील अंबिकापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी आकाशवाणी केंद्रात इंजिनिअर म्हणून रुजू झालो होतो. जवळपास पावणे दोन वर्षे सेवा केल्यानंतर दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात तीन महिन्यांसाठी प्रशिक्षणास पाठविण्यात आले. देशभरातील आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या इंजिनिअर्ससाठी हे केंद्र प्रशिक्षण देत असे. जवळपास सर्वच प्रशिक्षणार्थी करोलबागमधील एका लॉजमध्ये राहात असत. या काळात शनिवार आणि रविवार या सुट्टीत दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना आम्ही भेट देत असू. अशाच एका सुट्टीला जोडून सोमवार व मंगळवारीही सुट्टी होती. म्हणून आम्ही मित्रांनी आग्रा, मथुरा, फत्तेपूर सिक्री, सिकंदरा इत्यादी स्थळांना भेट देण्याचे ठरविले. 

या स्थळांना भेट देऊन झाल्यावर मंगळवारी (25 जुलै 1978) आग्रा येथील ताजमहाल पाहाण्यासाठी पोहोचलो. तेथे कूर्ता पायजमा घातलेले बॉब रुनेल्स नावाचे परदेशी गृहस्थ भेटले. त्या काळी परदेशातील व्यक्तीशी बोलताना वेगळाच असायचा. त्यातून आनंद मिळायचा. तेथे त्यांच्याशी बऱ्याच गप्पा झाल्या. नंतर ग्रुप फोटो वगैरे गोष्टी झाल्या. जाताना त्यांनी आमचा पत्र व्यवहाराचा पत्ता घेतला आणि अमेरिकेला गेल्यावर फोटो पाठविण्याविषयी सांगितले. तासाभराच्या भेटीनंतर आम्ही निरोप घेतला. आमच्याकडे त्यांचा पत्ता नव्हता. महिनाभरानंतर मी नोकरीच्या ठिकाणी परतलो. एक दिवस अचानक अमेरिकेहून पाकिट आले. त्यात आमचा फोटो आणि दोन पानी पत्र होते. बॉबने पाठविलेले. पत्रातील मजकूर वाचल्यानंतर समजले की बॉब शिकागोतील Westinghouse Electrical Corporation मध्ये टेलिकम्युनिकेश इंजिनिअर म्हणून काम करतात. शिवाय ते ऍमॅच्युअर रेडिओ इंजिनिअरही होते. कदाचित आम्ही आकाशवाणीत इंजिनिअर आहेत, म्हणून त्यांनी मैत्री केली असावी. त्यानंतर जवळपास वर्ष-दोन वर्षे आमचा पत्रव्यवहार सुरू होता. मीसुद्धा आम्ही घेतलेल्या फोटोची कॉपी त्यांना पाठवली. त्यानंतर पत्रव्यवहाराची शृंखला हळूहळू खंडित झाली. हा पत्रव्यवहार काही काळानं गहाळही झाला. मात्र, बॉब रुनेल्स आणि Westinghouse Electrical Corproation ही दोन नावं विसरलो नव्हतो. 
 

चार वर्षांच्या आकाशवाणी केंद्रातील नोकरीनंतर जळगावला बदली झाली. पुढं शिक्षकी पेशात यायचा निर्णय घेतला आणि नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम कॉलेजला भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून पाच ऑक्‍टोबर 1980 ला रुजू झालो. संशोधनाची आवड निर्माण झाल्याने पीचएडीही संपादन केली. मे 1991 मध्ये कॅलिफोर्नियातील सॅनदिएगो इथं आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त गेलो असताना बॉब रुनेल्सबद्दल शिकागोच्या कंपनीत फोन करून चौकशी केली. तेव्हा ते 1986 ला नोकरी सोडून गेल्याचे समजले. बॉबला भेटायची इच्छा अपूर्णच राहिली. जून 2008 मध्ये पुन्हा अमेरिकेला गेलो. तेव्हाही बॉबचा शोध अर्धवट राहिला. जुलै 2016 मध्ये अमेरिकेला राहायला गेल्यानंतर बॉबच्या आठवणीनं डोकं वर काढलं. शिकागो म्हणजे बॉब हे माझ्या मनात कायमचं रुजलेलं. त्यामुळं यावेळी शोध पूर्ण करायचाच असं ठरवलेलं. 

मुलगा आणि सून नोकरीला गेल्यावर घरातील छोटी मोठी जमेल ती कामे मी करतो. वेळ काढून भारतीय तसेच महाराष्ट्रीय मराठी वर्तमान पत्रांचे वाचन करायचो. आम्ही राहायचो तो परिसर (Lombard) उपनगर आहे व येथे Intenational Village म्हणून 600 फ्लॅट एकाच बंदिस्त आवारात आहेत. त्यापैकी जवळपास 400 फ्लॅटमध्ये भारतीय इंजिनीअर्स वास्तव्य आहे. उन्हाळा असल्याने आम्ही सर्व जण जास्तीत जास्त पालक एकत्र येत असतो. गप्पांमध्ये वेळ घाळवतो. कधीकधी बस, रेल्वे व ट्रॅक्‍सीचा आनंद घेऊन डाऊनटाऊन शिकागोमध्ये फिरायला जाऊन वेळ घालवतो. 

एके दिवशी गुगलवर सहज बॉबचा शोध घेतला. त्यामध्ये हजारो बॉब दिसले. मला बॉबबद्दल माहिती असलेल्या गोष्टी गुगलला सांगितला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर बॉबचे नाव व फोटो दिसला. अखेर बॉब सापडले. ते Milwaukee या शहरात We Energy या कंपनीमध्ये बॉब रूजू झाले होते व 2015 मध्ये सेवानिवृत्त झाले अशी माहिती मिळाली. मग बॉबच्या शेवटच्या कंपनीत फोन केला. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा संपर्क क्रमांक देण्यास कंपनीने नकार दिला. त्यानंतर मी फेसबुककडे मोर्चा वळवला. त्यावर बॉबचा शोध घेतला. मग त्याना फेसबुकवर मेसेज पाठवला. मात्र ते नियमित फेसबुक पाहत नसल्याने माझा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यानंतर मग एक युक्ती केली. बॉबच्या 2-3 मित्रांना फेसबुकवर मेसेज पाठवला आणि माझ्याबद्दल माहिती दिली. त्यापैकी Dave Hampson या बॉब यांच्या मित्राने मला बॉबचा संपर्क क्रमांक मेसेज केला. मात्र त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर कोणीही प्रतिसाद देत नव्हते. पुन्हा मग Dave यांना संपर्क केला. त्यांनी बॉब बाहेरगावी गेल्याचे सांगितले. पुन्हा 2-3 दिवसांत येतील असे सांगण्यात आले. 

पुढील 2-3 दिवसातच आमचा संपर्क झाला. त्यांनी फोन उचलला. ताजमहाल, 38 वर्षांपूर्वीची भेट, पत्रव्यवहार वगैरे साऱ्या गोष्टी बॉबला आठवल्या. माझ्याप्रमाणेच त्यांनाही खूप आनंद झाल्याचे त्यांच्या संभाषणातून समजले. मग दोघांच्या सोयीने शिकागोला प्रत्यक्ष भेट ठरली. त्याप्रमाणे 27 ऑगस्ट 2016 हा दिवस ठरला. ठरलेल्या दिवशी बॉब त्यांची पत्नी जेन व मुलगा रेयॉन ती हो ही रात्रीच्या जेवणासाठी भारतीय हॉटेलमध्ये आले. आम्हीही आमच्या सर्व कुटुंबासमवेत पोहचलो. प्रत्यक्ष बॉब 38 वर्षानंतर मला भेटत आहेत. ह्याचा मला खूप आनंद झाला. तसेच बॉब आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमची भेट झाल्याचा खूप आनंद झाला. आमचे दोघेही कुटुंबीय एकमेकाची चौकशी करुन जेवणास बसलो. आमचे कुटुंबीय व बॉबचे कुटुंबीय पूर्णपणे समरस होऊन गप्पात रंगल्याचे दिसत होते. त्याचा आम्हा दोघा मित्रांना खूप आनंद झाला. जवळपास 3-4 तास आम्ही खूप गप्पा केल्या. जेवणे झाली. पुन्हा एकदा फोटो सेशन झाले. पूर्वी ताजमहाल परिसरातील आमचा फोटो प्रमाणे पुन्हा शिकागोमधील भारतीय हॉटेलबाहेर फोटो घेतले. सर्व कुटुंबीयासमेत फोटो घेतले व रात्री त्यांना पुन्हा Millwaukee ला जाण्यासाठी आम्ही एकमेकांचे अलींगण घेऊन निरोप दिला. 
अशी झाली दोन मित्रांची व त्यांच्या कुटुंबीयांची 38 वर्षानंतर पुर्नभेट !