ह्युस्टनमध्ये मराठीजनांची दिवाळी

अमेय वाकडे
Monday, 21 November 2016

दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी..! दिवा जसा अंधार दूर करून प्रकाश देतो, तसंच आपल्या अंत:करणाची ज्योतही आपल्या अहंकाराचा अंधार दूर करते. याच उद्देशाने आपल्याकडे घरोघरी दिव्यांची रांग लावली जाते. परदेशात स्थायिक झालेले भारतीयही अतिशय उत्साहात दिवाळी साजरी करतात.

दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी..! दिवा जसा अंधार दूर करून प्रकाश देतो, तसंच आपल्या अंत:करणाची ज्योतही आपल्या अहंकाराचा अंधार दूर करते. याच उद्देशाने आपल्याकडे घरोघरी दिव्यांची रांग लावली जाते. परदेशात स्थायिक झालेले भारतीयही अतिशय उत्साहात दिवाळी साजरी करतात.

ह्युस्टनचे मराठी मंडळ गेल्या 40 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक सण अगदी जोरदार साजरा करत आले आहे. 2016 मध्येही हीच परंपरा कायम राखली. उलट, यंदाच्या वर्षी कार्यक्रम अधिकच धमाकेदार होते. यंदा 'एच.एम.एम.'ने 12 नोव्हेंबर रोजी केटी येथील विल्यम स्कूलमध्ये दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला 400 हून अधिक मराठी रसिकांनी उपस्थित होते. या कार्यक्रमात 50 हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. प्रवेशद्वारावर रसिकांचे स्वागत करण्यासाठी नक्षीदार रांगोळ्या आणि दिव्यांची रांग मांडली होती. आत आल्यानंतर रंगीबेरंगी मराठमोळा पोषाख केलेली मंडळी पाहून मन प्रसन्न झाले. आपल्या मायदेशाची उणीव जाणवली नाही. मीदेखील त्या रंगीत गर्दीत हरवून गेलो होतो.

ठिकठिकाणी साड्या, दागिने, मसालाविक्रीचे स्टॉल होते. कोपऱ्यात एक मेंदी काढणाऱ्या महिलेच्या बाजूला मुलींची गर्दी जमली होती. सुरवात झाली ती स्वादिष्ट फराळाने.. पोह्याचा चिवडा, बेसनाचा लाडू आणि चकली..! वाह! क्‍या बात है..!

मंजुषा जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली रचलेल्या मंगलमय गणेश वंदनाच्या नृत्याने. वर्षानुवर्षे 'एच.एम.एम.'च्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी धडपड करणाऱ्या मंडळाच्या सर्व अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. उमा राजगुरु यांनी सर्व अध्यक्षांसह 'चाळीस वर्षांचा आढावा' हा अप्रतिम पोवाडा गायला. अजय कोठी आणि गांधार कोठी यांनी निवेदन केले. त्यानंतर अभ्यासात, खेळात आणि कामामध्ये अव्वल कामगिरी करणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. काशिनाथ पाटील यांनी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये खूप मोठे योगदान दिले आहे. भारतातील 'आयआयटी'च्या पहिल्या बॅचमधून त्यांनी पदवी घेतली होती. शार्दूल अहिरे अमेरिकेतील 'यूएसएसीए'च्या 14 वर्षांखालील संघात निवडला गेला आहे. अशा या मराठीजनांचे योगदान पाहून मला मराठी असल्याचा अभिमान वाटला.

हॉलच्या दुसऱ्या भागात रॉबर्ट बॅरी नावाच्या जादुगाराची करामत पाहण्यासाठी लहान मुलांची गर्दी जमली होती. नेहमी वाऱ्यासारखी धावणारी ही मुलं आज चक्क एका जागी बसली होती, हीच खरी जादू..!

त्यानंतर विविध हिंदी गाण्यांवरील नृत्य सादर करण्यात आले. ही नृत्ये बसविण्यासाठी मंजुषा जाधव, पारिजा दिघे गुहा, भक्ती नाईक वाकडे, अभिषेक भट यांनी गेले दोन महिने इतर जबाबदाऱ्यांबरोबरच यावरही खूप परिश्रम घेतले. त्याच परिश्रमांचे आज चीज झाले. प्रत्येक गाण्याला 'वन्स मोअर'ची दाद मिळाली. मंडळाच्या समितीच्या सदस्यांनीही कुठलीही कसर ठेवली नाही. रवी आणि मेघा ओझरकर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'दिवाळी करूया वेगळी' या नाटकाद्वारे 'एच.एम.एम.'च्या सदस्यांनी आपल्या प्रेक्षकांशी छान संवाद साधला.

'फक्त मंडळाच्या सदस्यांनीच का भाग घ्यावा' म्हणून यंदा 'सैराट'मधील 'झिंगाट' या गाण्यावर 'फ्लॅश मॉब'चे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांमधील प्रत्येक जण सोहळ्यात सहभागी झाला. कार्यक्रम संपल्यानंतर एक वेगळीच उर्जा घेऊन सगळे जेवणाच्या रांगेत उभे राहिले. 'मिर्च मसाला' या ह्युस्टनमधील हॉटेलमधून जेवण मागविले होते. पावभाजी आणि पुलाव या मेन्यूचा सर्वांनी फडशा पाडला. या कार्यक्रमाचे छायाचित्रिकरण समीर पाटील आणि राजेश थत्ते यांनी केले.

सर्व रसिक प्रेक्षकांना, सहभागी झालेल्या सर्व उत्साही कलाकारांना, स्टॉलवर एकाच जागी तासनतास थांबून ग्राहकांची काळजी घेणाऱ्या आणि या कार्यक्रमाची आठवण टिपणासाठी अप्रतिम छायाचित्रे काढणाऱ्या सर्व छायाचित्रकारांना 'एच.एम.एम.'चा सलाम..! यंदाच्या वर्षातील 'एच.एम.एम.'चा अखेरचा कार्यक्रम म्हणजे 11 डिसेंबर रोजी आयोजित केलेला 'व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाचा खेळ..!

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आम्हा सर्व मराठी रसिकांकडून 'एच.एम.एम.'च्या अध्यक्षा मेघा ओझरकर आणि त्यांच्या समितीचे मन:पूर्वक अभिनंदन! पुढील वर्षीही मराठी कार्यक्रमांची पताका नव्या उंचीवर फडकाविण्यासाठी 'एच.एम.एम.'ने अंजू साठे-केलर यांची 2017 साठी अध्यक्ष म्हणून निवड केली. अंजू यांना शुभेच्छा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Houston ones Diwali in Marathi peoples

फोटो गॅलरी