esakal | स्वीडनमध्ये अनुभवलेला मध्यरात्रीतला सूर्य(पैलतीर)
sakal

बोलून बातमी शोधा

स्वीडनमध्ये अनुभवलेला मध्यरात्रीतला सूर्य(पैलतीर)

स्वीडनमध्ये अनुभवलेला मध्यरात्रीतला सूर्य(पैलतीर)

sakal_logo
By
उज्ज्वला ऍण्डरसन (चाफळकर), स्वीडन

सूर्य मध्यरात्री आभाळात झळकतो? म्हणजे हा काय प्रकार आहे? हा प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. परंतु ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे. यामध्ये अजिबात अतिशयोक्ती नाही. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात 21 जून हा दिवस वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो. भारतात सुद्धा हा दिवस थोडासा मोठा म्हणजे साधारण 13 तासांचा असतो. त्या दिवशी स्वीडन, नॉर्वे, फिनलंड सारख्या उत्तर ध्रुवाच्या बाजूला असलेल्या देशांच्या उत्तरेच्या टोकाला सूर्य मावळतच नसल्यामुळे दिवस 24 तासांचा असतो. इथे जून आणि जुलैच्या दरम्यान मध्यरात्रीत आपल्याला सूर्यदर्शन घडते. त्यालाच मध्यरात्रीचा सूर्य (Midnight sun) असे म्हटले जाते. 24 तास लख्ख उजेडच असतो. मध्यरात्र असूनही चहूफेर ऊन पडलेले असते.

या काळात पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो आणि त्यामुळे सूर्य उत्तर गोलार्धाच्या जवळ असतो. या ठिकाणी सूर्याच्या किरणांची तीव्रता आणि मुबलकता असते. सूर्य क्षितीजाखाली जात नसल्यामुळे मध्यरात्र सुद्धा उजेड असतो. मध्यरात्रीच्या सूर्याचे दर्शन घ्यायचे असेल तर आपल्याला स्वीडनच्या उत्तर भागात जावे लागते. काही वर्षांपूर्वी तसा योग मला लाभला. तिथे फ्येलन नावाच्या उंच पर्वतांच्या रांगा आहेत. रात्रीच्या वेळी आभाळात चमकणारा सूर्य बघण्यासाठी लोकं तिथे जातात. आम्ही काही मित्रमैत्रिणी मिळून ऑबिस्को नावाच्या गावाजवळ असलेल्या उंच फ्येलनवर म्हणजे पर्वतावर गेलो. पर्वतावर जाण्यासाठी लिफ्टची योजना होती. रात्रीचे 11 वाजले असतानाही लखलखीत उजेड होता. साधारणपणे 1000 मीटर उंचीवर पर्वताचे शिखर आहे. तिथे पोचल्यावर स्वच्छ हवा आणि मंद वाऱयाने आमचं स्वागत केलं. सुदैवाने आभाळात फारच थोडे ढग होते, त्यामुळे सूर्यदेव ढगाआड लपू शकत नव्हते. किरणं चहूफेर पसरली होती. घड्याळ तर आम्हाला रात्रीचे बारा वाजलेत हे सांगत होतं, पण प्रत्यक्षात मात्र ऊन पडलेलं होतं. हा अनुभव अतिशय चमत्कारिक आणि विलक्षण होता. अंगाला चिमटा काढून स्वतःला सांगावं लागत होतं की हे दिवसाचे नसून रात्रीचे 12 वाजले आहेत. मनाला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी ते मान्य करणं अवघड जात होतं!

स्वीडनमध्ये हा मध्यरात्रीच्या सूर्याचा उत्सव साजरा करण्याची एक खूप जुनी प्रथा आहे. 21 जूनला स्टोकहोमच्या भागात आणि स्वीडनच्या दक्षिणेकडच्या भागात दिवस साधारण 19 ते 20 तासांचा असतो. हा वर्षातला सर्वांत मोठा दिवस असल्याने त्याला मिडसमरचा दिवस असेही संबोधले जाते. हा दिवस देशभर जागोजागी अतिशय जोरदारपणे सार्वजनिक पद्धतीने साजरा केला जातो. शिवाय, अत्यंत महत्वाचा उत्सव म्हणून मानला जातो. या उत्सवाला नाताळच्या सणाइतकेच महत्व दिले जाते. या दिवशी सर्वांना सुट्टी असते. ही प्रथा खूप जुनी आणि पारंपरिक म्हणजे साधारणपणे एक हजार वर्षांची आहे. हजार वर्षांपूर्वीच्या स्वीडनमधील रहिवाशांना वायकिंग असे नाव होते. त्यांनी हा सण साजरा करायला सुरवात केली होती, असे म्हणले जाते.

मी, स्वीडनमध्ये अनेक वर्ष राहात असल्याने मिडसमरच्या उत्सवाचा अनुभव वर्षानुवर्षे घेत आहे. सूर्य हाच पृथ्वीवरच्या ऊर्जेला आणि जीवनिर्मिती करायला कारणीभूत आहे, याचा प्रत्यय मे, जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये स्वीडनमध्ये तीव्रतेने येतो. कारण या दिवसातच आत्तापर्यंत थंडीने गोठलेला निसर्ग जागा होतो आणि तऱ्हेतऱ्हेच्या रंगांनी आणि पानाफुलांनी बहरून जातो. ग्रीष्म ऋतू चालू असल्यामुळे हवा उबदार असते. त्यामुळे उत्साहाला उधाण येते.मिडसमरच्या उत्सवासाठी गावोगावी फुलापानांनी मढवलेले विशिष्ट प्रकारचे उंच खांब उभे केले जातात. या खांबाला मिडसमर खांब असेच म्हणतात. या खांबाला अगदी वरती त्रिकोणी आकाराच्या काठ्या लावून एका बाणाचा आकार दिलेला असतो. आडव्या काठीवर दोन्ही बाजूला रींग्स अडकवलेल्या असतात. गावातल्या प्रत्येक भागात असा एक सुंदर रीतीने सजवलेला मिडसमर खांब सार्वजनिक ठिकाणी उभा केला जातो. हा खांब सुपीकतेचं आणि त्याच्या आनंदाचं प्रतीक आहे असे मानले जाते. निसर्गामध्ये या दिवसात बहर आलेला असतो त्यामुळे आजूबाजूला तऱ्हेतऱ्हेच्या फुलांची आणि पानांची विपुलता असते. उत्साही मंडळी आजूबाजूच्या रानातून सुंदर फुले, पाने, झाडांच्या छोट्या फांद्या आणतात आणि त्यांनीच मिडसमर खांब सजविला जातो.दुपारच्या वेळी गावातली माणसं सुंदर रंगीबेरंगी कपडे घालून या खांबांभोवती गोळा होतात. एरवी इथे डोक्‍यात फुलं घालण्याची पद्धत फारशी आढळत नाही. पण या दिवशी मात्र लोकं आजूबाजूला निसर्गात वाढलेली सुंदर रानटी फुले वेचून आणतात आणि कौशल्याने स्वतःच्या हातांनी त्यांच्या वेण्या बनवतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण फुलांच्या वेण्या डोक्‍यावर घालून आनंद व्यक्त करतात. तऱ्हेतऱ्हेच्या वेण्या बनवण्यात स्वीडिश लोकं पटाईत आहेत. रानावनात वाढलेल्या या नैसर्गिक फुलांना या दिवशी अतिशय महत्व दिलं जातं आणि त्यांचा आनंदही उपभोगला जातो.

वेगवेगळे कलाकार, संगीतकार आपली अकोर्डीयन, व्होयलीन, ड्रमस, गिटार या सारखी वाद्य घेऊन पारंपरिक संगीत वाजवायला खांबांभोवती सज्ज असतात. लाउडस्पीकर्सवर पारंपरिक गाणी म्हटली जातात. या सर्व गाण्या बजावण्यावर, जमलेली मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक आणि सामुहिक नाच करतात. हा नाच आपल्या भोंडल्याप्रमाणे एकमेकांचे हात धरून, वर्तुळाकारात फिरून केला जातो. नाचात अगदी छोट्या बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सामील होतात आणि मजेत गाण्याचा आणि नाचण्याचा उपभोग घेतात.

संध्याकाळी मित्रमैत्रिणी एकमेकांबरोबर सहभोजन करतात. या वेळी ठरलेला जेवणाचा बेत म्हणजे हेरींग नावाचा मासा त्याच्याबरोबर उकडलेले छोटे छोटे बटाटे असतात आणि सायीच्या दह्यातली पातीच्या कांद्याची कोशिंबीर असा मेनू असतो. शिवाय, बार्बेक़्यु पण मजेत केला जातो. जेवण झाल्यावर स्ट्रॉबेरीची गोड आणि रुचकर केक खायला मजा येते. याच दिवसात ताज्यातवान्या स्ट्रॉबेरीजच पीक निघायला लागलेलं असतं. आपल्याकडे भारतात कशी पहिल्या आंब्यांची वाट बघितली जाते तशीच स्वीडनमध्ये पहिल्या स्ट्रॉबेरीजचची आतुरतेने वाट पहिली जाते. अशा तऱ्हेने मध्यरात्रीतल्या सूर्यदेवाचं अस्तित्व स्वीडन या देशात उत्साहाने साजरं केलं जातं.

21 जून हा दिवस उलटल्यावर उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते आणि दिवस हळूहळू लहान होत जातो. सहा महिन्यानंतर म्हणजेच 21 डिसेंबरला वर्षातला सर्वांत छोटा दिवस असतो. स्वीडनच्या अगदी उत्तर भागात, डिसेंबरमध्ये पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून दूर कललेला असल्याने सूर्य उगवतच नाही. 24 तास अंधार असतो. म्हणूनच इथल्या सर्वांना मध्यरात्रीच्या सूर्याची आणि त्याच्या 24 तास उजेडाची इतकी अपूर्वाई आहे. त्यामुळे साहजिकच ती जोरदारपणे साजरी का केली जाते, हे कुणालाही कळू शकते!