पुष्य नक्षत्राचा पाऊस "या' तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी ठरतोय "कभी खुशी, कभी गम'!

Sangola Rain
Sangola Rain

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात शुक्रवारी पुष्य नक्षत्राच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. हा पाऊस खरीप पिकांसाठी उपयुक्त असला, तरी सतत पडणाऱ्या या पावसामुळे फळबागांवर मात्र मोठी रोगराई पसरत आहे. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी "कभी खुशी, कभी गम' ठरत आहे. 

शुक्रवारी सकाळपासून सगळीकडेच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून पावसाच्या हलक्‍या सरी पडण्यास सुरवात झाली होती. शहरासह ग्रामीण भागातील कोळा, जुनोनी, पाचेगाव, किडबिसरी, गौडवाडी, हातीद, संगेवाडी, मांजरी, बामणी, हलदहिवडी, आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव, मेथवडे, वाकी-शिवणे, धायटी, चोपडी यांसह परिसरात पाऊस झाला. हा पाऊस खरिपाच्या मका, बाजरी, सूर्यफूल व इतर पिकांसाठी उपयुक्त ठरत असला तरी द्राक्ष, डाळिंब या फळबागांसाठी मात्र हानिकारक ठरत आहे. 

सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण, त्यातच अधूनमधून पडणारे कडक ऊन यामुळे डाळिंबावर तेल्यासह इतर रोगांचे प्रमाण वाढत आहे. तर द्राक्ष पिकांवर दावण्याचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. पावसामुळे फळबागा फवारणी करण्यासह अडचणीचे ठरत आहे. सध्या बहार धरलेल्या डाळिंबावर तेल्यासह काळे डाग, कुजवा, थ्रीप्सचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. याअगोदरच तालुक्‍यात नीरा-उजवा, टेंभूचे पाणी मिळाले होते. यावर्षी नदीलाही पाणी सोडण्यात आले होते. तर पाझर तलावही पाण्याने भरून घेतले होते. त्यातच तालुक्‍यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com