कोरोना उपचारातील 'या' पंचसूत्री आधारे कोविड सेंटरचा बनला सोलापूर पॅटर्न !

covid centre.jpg
covid centre.jpg

सोलापूर,ः कोरोनाग्रस्तांच्या उपचारात रुग्णांना धास्तीमधून मुक्त करत सकारात्मक उपक्रमाच्या माध्यमातून उपचार देण्याचा केटरिंग कॉलेज कोविड सेंटरचा पॅटर्न आता जिल्हयात कोरोना उपचारात नवी दिशा देणारा ठरतो आहे. समुपदेशन, सकस आहार, स्वच्छता, संगीत, योगासने या पंचसुत्रीच्या सोबत उपचारामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण निश्‍चित वाढेल हा विश्‍वास निर्माण होऊ लागला आहे. 

सोलापुरातील महाराष्ट्र इंन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी महाविद्यालय सध्या कोविड केअर सेंटर म्हणून कार्यरत केले आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना उपचाराच्या सोबत प्राणायाम, योगासने, संगीताचा उपयोग केला जात आहे. या सेंटरमध्ये 178 सध्या पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या सेंटरमध्ये रवी कंटला आणि शिवानंद पाटील यांची योग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. तसेच शाहीर रमेश खाडे यांच्या संगीताचे कार्यक्रम घेतले जातात. रुग्णांचे आनंददायी मनोरंजन व्हावे या साठी एफएम रेडीओ सेवा बसवली. 

सकाळी सात ते आठ या वेळात विशेष योगतज्ञ या रुग्णांकडून योगासने व प्राणायाम करून घेतात. यामुळे रुग्ण स्वतः भीतीच्या मानसिकतेतून स्वतःच्या निर्भय होऊ लागले आहेत. प्राणायामाने त्यांच्या श्वसनाच्या त्रासामध्ये मोठी सुधारणा होत आहे. 
रूग्णांना सकाळी दूध, दोन अंडी, दुपारी व संध्याकाळी सकस व दर्जेदार जेवण आणि फळे दिली जात आहेत. उत्तम प्रकारच्या आहाराने या रुग्णांना घरी असल्याची भावना त्यांच्या मनाला उभारी देणारी ठरली आहे. हा ताजा आहार त्यांच्या उपचाराला पुरक ठरतो आहे. कोविंड सेंटरची स्वच्छतेमध्ये निर्जंतुकीकरण व स्वच्छतेच्या इतर कामे काटेकोरपणे केली जातात. 
कोरोना झाल्याने तणावाखाली असलेल्या रुग्णांला तणावमुक्त करण्यासाठी उत्तम करमणूकीची साधने दिली आहेत. त्यासोबत संगीताचे कार्यक्रमाने देखील या रुग्णांच्या मनस्थितीमध्ये कमालीची सुधारणा होत असल्याचा अनुभव येतो आहे. या सोबत डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम देखील उपचारासाठी प्रभावीपणे काम करत आहे. या सेंटरमधून आतापर्यत 138 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत. 

इतर कोविड सेंटरमध्ये पॅटर्न राबवणार 
सर्व यंत्रणांनी एकत्र येत कोरोना उपचाराचा रुग्णांना दिलासा देणारा पॅटर्न राबवला आहे. योगासने, प्राणायाम, संगीत हा पॅटर्न जिल्ह्यातील अन्य कोविड केअर सेंटरमध्येही राबविला जाईल. कोविड सेंटरमध्ये समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात येईल. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर 

परिणामकारक टिमवर्क 
तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या टीमने सेंटरमध्ये बदल केले. या सर्व सुविधाचा चांगला परिणाम म्हणून उपचार घेतलेले रूग्ण बरे होऊन आनंदाने बाहेर पडत आहेत. 
- ज्योती पाटील, प्रांताधिकारी 

रुग्णांचे समुपदेशन महत्वाचे 
कोरोना रूग्णांना प्रथमत: समुपदेशनाची गरज असते. रूग्णांची श्वसनक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी प्राणायाम आणि योगासनांची नितांत गरज आहे. येत्या काही दिवसात मालेगावमध्ये वापरण्यात आलेला मन्सुरा काढा सुरू करण्याचा मानस आहे. 
- डॉ. दिगंबर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, दक्षिण सोलापूर तालुका 

तणावमुक्ती उपचारात प्रभावी 
 मानसिकदृष्ट्या सक्षम राहून कोरोनाचा मुकाबला करायला हवा. संगीत, करमणूक, योगासने, प्राणायामामुळे मन शांत राहून अतिचिंता व अतिविचार टाळला जाऊ शकतो. पुरेशी झोप, योग्य व ताजा आहाराबरोबर योग्य उपचाराने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होईल. 
- डॉ.प्रसन्न खटावकर, मानसोपचार तज्ञ 

उपचारासाठी सतर्क यंत्रणा 
सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने दिवसातून तीनवेळा राऊंड घेऊन रूग्णांच्या समस्या जाणून घेतो. हृदयाचे ठोके तपासणे, ऑक्‍सिजन प्रमाण तपासून औषधाबरोबर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रतिजैविके व इतर उपचार देण्यात येतात.
- डॉ.प्रविण खारे, सेंटर समन्वयक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com