शंकरोबा आज येणार, गौराई नटणार...! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कोल्हापूर : आली आली गौरी, सोन्या-रुप्याच्या पावलानं...आली आली गौरी... धनधान्याच्या पावलानं... 

अशा चैतन्यदायी वातावरणात आज घरोघरी सवाद्य मिरवणुकीने गौराईचे आगमन झाले. पावसाची तमा न बाळगता महिलांनी सळसळत्या उत्साहात हा सोहळा साजरा केला. उद्या (ता. 30) शंकरोबाचे आगमन होणार असून त्याच्या स्वागतासाठी गौराई नटणार आहे. दरम्यान, पंचगंगा घाट, रंकाळा, कोटितीर्थ आदी ठिकाणी गौरी आवाहनासाठी महिला व मुलींनी मोठी गर्दी केली. या निमित्ताने अस्सल मराठमोळी संस्कृती येथे अवतरली. बेंजो, डोलीबाजा आणि बॅंडवरील गौराईगीतांच्या सुरावटींनी शहराचा कानाकोपरा दुमदुमून गेला. 

दुपारी बाराच्या सुमारास नटूनथटून गौरी आवाहनासाठी महिला बाहेर पडल्या. गटागटाने महिला पंचगंगा, रंकाळ्याकडे येऊ लागल्या. तेथे विधिवत पूजा आणि आरती झाल्यानंतर झिम्मा-फुगड्यांचा फेरही त्यांनी धरला. गौराई गीतांनी हा सारा परिसर महिलांच्या आनंदोत्सवाने भारून गेला. शिवाय शालू, नथ आणि विविध अलंकारांनी नटलेल्या या महिला आणि मुलींनी मराठमोळ्या बाजाचे दर्शन घडविले. 

लहान कलशात विधिवत पूजा करून 'गवर' ठेवून त्या घेऊन विविध वाद्यांच्या गजरात महिलांचे ताफे रवाना होत होते. पावसामुळे बहुतांश महिला रिक्षा, चारचाकी वाहनांतूनही गौरी आवाहनासाठी येथे आल्या, तर काही कुटुंबांनी दुचाकीवरूनही गौरी आवाहनासाठी येथे हजेरी लावली. काही शाळांतील मुलींनी गौरी आवाहन केले. शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याही झिम्मा-फुगडीला उधाण आले, तर शिक्षिकांच्या गौराई गीतांत आपलाही उत्साही सूर मिळवत त्यांनी येथे आपल्या अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे धडे गिरवले. परंपरेप्रमाणे आगमन झाल्यानंतर भाजी-भाकरीच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली. भाजी-भाकरीचा नैवेद्य मिळाल्यानंतर गौराई-शंकरोबाच्या प्रतीक्षेत विसावल्या. 

सेल्फी सेल्फी रे 
पंचगंगा घाटावर एकीकडे झिम्मा-फुगडीचा आनंदोत्सव सुरू होता आणि त्याच वेळी तरुणींचा गौराईसह सेल्फी घेण्याची धांदलही सुरू होती. केवळ सेल्फी घेऊन न थांबता तिथूनच ते फोटो सोशल मीडियावरून शेअरही केले जात होते. 

झिम्मा-फुगडीचा फेर 
पावसाने हजेरी लावली असली तरी शहरातील बहुतांश पेठांत आता रात्री महिलांचे झिम्मा-फुगडीचे खेळ रंगू लागले आहेत. उद्या (ता. 30) शंकरोबा आल्यानंतर गौराई व शंकरोबाची यथासांग पूजा होईल आणि त्यानंतर रात्रभर भानोरा रंगेल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav