वाद्यांच्या सजावटीतून ‘संगीत गणेश’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

साताऱ्यात पद्माकर पाठकजींची नवकल्पना; २१ वाद्यांचा वापर
सातारा - माणूस एखादी बाब करायला लागला तर त्याची वृत्ती, आवड, विचार आणि छंद ही त्याच्या कृतीतून प्रत्यक्षात उतरतात. पद्माकर पाठकजी यांनी यंदा घरगुती उत्सवात ‘संगीत गणेश’ साकारला आहे. पाठकजी यांना संगीताची आवड आहे. त्यावर त्यांनी लिखाणही केले आहे. हीच आवड त्यांनी श्री गणेशाच्या सजावटीत उतरवली आहे.  

पाठकजी यांना साहित्याचीही आवड असल्याने गतवर्षी घरातील पुस्तकांच्या साह्याने त्यांनी ‘ज्ञान गणेश’ साकारला होता. यंदाचा ‘संगीत गणेश’ही नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे. गणेशाच्या सजावटीसाठी २१ वाद्ये जमविण्याचा संकल्प त्यांनी केला होता. हा संकल्प त्यांनी मित्र, नातेवाईक आणि घरात असलेली वाद्ये जमवून पूर्ण केला. याबाबत पाठकजी म्हणाले, ‘‘तंबोरा, सतार, संवादिनी, तबला यांसह दिलरुबा, सनई-चौघडा, जलतरंग, मृदंग, ट्रम्पेट यासारखी विविध वाद्ये एकत्र केली. विविध गायक-गायिका, संगीतकारांची छायाचित्रे जमा केली. घरात असलेली संगीतविषयक पुस्तकेही सजावटीसाठी वापरली. 
 
संगीत ऐकण्याच्या माध्यमाचा प्रवासही मांडायचा ठरवला. ग्रामोफोन, ‘नॅशनल एको’च्या रेडिओपासून ते पेन ड्राइव्हपर्यंत विविध वस्तू संग्रहात होत्याच. त्याही एकत्र केल्या. ज्या शहरात आमच्यावर संगीताचे संस्कार झाले, त्या साताऱ्यातील संगीत साधकांच्या नावांचे संकलनही या निमित्ताने झाले. अगदी दरबारी गायकांपासून ते आजच्या पिढीतील गायक- वादक, संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या नावांचे संकलन करण्यात आले.

सजावटीमध्ये वैविध्य आणण्यासाठी वाद्यांच्या छायाचित्रांच्या साह्याने सजवलेली दीपमाळ, संगीतातील विविध रागांची कमान, विविध राग आणि तालांपासून तयार केलेला स्वर-ताल वृक्ष अशा विविध बाबी घरीच तयार केल्या. साताऱ्यातील विविध कलाकारांनी विविध वाद्यांचे वादन करणाऱ्या गणेशाची चित्रे साकारली. या संपूर्ण सजावटीला पूरक म्हणून वीणा वादन करणारी गणेशमूर्ती मूर्तीकाराकडून तयार करून घेतली. गेले काही महिने सुरू असलेल्या मेहनतीतून हा ‘संगीत गणेश’ साकारला आहे.’

Web Title: ganesh festival 2017 satara ganesh utsav music ganesh