मोरयाऽऽच्या गजरात तासगावला रंगला रथोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

तासगाव : "गणपती बाप्पा मोरया ऽऽ, मोरया ऽऽ मोरया ऽऽ'च्या जयघोषात आज तासगावच्या सिद्धिविनायकाचा 238 वा रथोत्सव झाला. रथयात्रा तब्बल चार साडेचार तास सुरू होती. भाविकांच्या अलोट उत्साहात रथोत्सव झाला. रथयात्रेसाठी राज्यभरातून लाखभर भाविकांनी उपस्थिती लावली. दुष्काळाचे सावट असूनही भाविकांत उत्साह जाणवत होता. 

तासगावच्या पटवर्धन संस्थानच्या श्री गणपती पंचायतनचा रथोत्सव दरवर्षी भाद्रपद शु. पंचमीला होतो. हा रथोत्सव राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या वर्षी रथोत्सवाचे 238 वे वर्ष होते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी "श्री' वडिलांना भेटण्यासाठी म्हणून काशिविश्‍वेश्‍वरांच्या मंदिरापर्यंत रथातून जातात, असे मानले जाते. तीन मजली लाकडी कोरीवकाम केलेला रथ हजारो भाविक श्रद्धेने ओढतात. रथोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात "श्रीं'च्या दर्शनासाठी गर्दी केली. 

दुपारी एक वाजेपर्यंत भाविकांची विक्रमी गर्दी झाली. सव्वा एक वाजता रथयात्रा सुरू झाली. विधिवत पूजन करून रथात 125 किलो वजनाची पंचधातूची मूर्ती ठेवली. रथात पटवर्धन संस्थानचे श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्यासह 23 विविध जाती-धर्मांचे मानकरी विराजमान झाल्यानंतर गणपतीची आरती आणि राष्ट्रगीत म्हणून रथयात्रा सुरू झाली. मोरयाऽ मोरयाऽऽ...च्या जयघोषात रथयात्रा फुटाफुटाने पुढे सरकत होती. रथयात्रेच्या अग्रभागी सनई-चौघडा आणि झांज पथकासह संस्थानची गौरी हत्तीण दिमाखाने चालत होती. 

सायंकाळी पटवर्धन राजवाड्यात वाड्यातील गणपतीचे विसर्जन करून मानकऱ्यांना मानाचे विडे दिले. खासदार संजय पाटील, माजी आमदार शंभूराजे पाटणकर यांनीही रथयात्रेत सहभाग घेतला.

Web Title: Ganesh Festival 2017 Tasgaon Ganesh Utsav