सुज्ञ कोल्हापूरकर...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

घरगुती गौरी-गणपती पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद

घरगुती गौरी-गणपती पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद

‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, चला, पर्यावरण वाचवू या’ असा संदेश देत आज शहर आणि जिल्ह्यात मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. दुपारी दोनपासून विविध वाद्यांच्या गजरात गल्ली-गल्लीतून ताफ्याने विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. आबालवृद्धांच्या प्रचंड सहभागात झालेल्या या सोहळ्यात मुली आणि महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला. रात्री नऊपर्यंत हा सोहळा सळसळत्या उत्साहातच सुरू राहिला. यंदा शहरासह जिल्ह्यातही पर्यावरणपूरक विसर्जनावर भर राहिला. साहजिकच बाप्पा आणि गौराईने जाता जाता जणू ‘सुज्ञ कोल्हापूरकर’ असाच आशीर्वाद सर्वांना दिला. 

पंचगंगा घाट - ‘बाप्पा मोरया’चा गजर
शहरातील पंचगंगा घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, रुईकर कॉलनी, मंगेशकरनगर आदी ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन झाले. पंचगंगा घाटावर सकाळी आठ वाजता पहिली मूर्ती विसर्जनासाठी आली. दुपारी तीनपर्यंत येथे तुरळक प्रमाणात गर्दी राहिली. त्यानंतर मात्र येथे गर्दीने उच्चांक गाठला. घाटापासून तोरस्कर चौक आणि गंगावेसपर्यंत रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. घरगुती गणपतींबरोबरच काही सार्वजनिक तरुण मंडळांचे गणपतीही विसर्जनासाठी येत असल्याने त्यांच्या ढोल-ताशा, डोलीबाजा, बेंजोच्या तालावर सर्वांचीच पावले थिरकत होती. 

विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, करमणुकीच्या साधनांनीही येथे हजेरी लावली होती. महापालिका, पंचगंगा घाट संवर्धन समिती आणि विविध पर्यावरणप्रेमींच्या वतीने येथे मंडप उभारून काहिली ठेवण्यात आल्या होत्या. त्याच्याच बाजूला निर्माल्य संकलित केले जात होते. कोणत्याही आवाहनाशिवाय स्वयंस्फूर्तीने येथे पर्यावरणपूरक विसर्जन सुरू राहिले.

पर्यावरणपूरक विसर्जन झालेल्या मूर्ती सजविलेल्या ट्रॉलीतून इराणी खणीत विसर्जनासाठी नेण्यात आल्या. संकलित झालेले निर्माल्य नेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, महापालिकेने या उपक्रमासाठी मोठी यंत्रणा राबवली. व्हाईट आर्मीचे जवानही दुर्घटना होणार नाही, यासाठी सतर्क होते.

महापालिकेतर्फे गौरव 
पर्यावरणपूरक विसर्जन केलेल्या कुटुंबांना महापालिकेतर्फे ‘सुजाण व सुज्ञ कोल्हापूरकर’ असे प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. महापौर हसीना फरास सायंकाळी पाचच्या सुमारास घाटावर आल्या. त्यांच्या हस्तेही प्रशस्तिपत्रे झंवर उद्योग समूहाच्या श्रीराम फौंड्रीच्या वतीने पर्यावरणपूरक विसर्जन उपक्रम राबवण्यात आला. त्यांची नोंदही स्वयंसेवक करून घेत होते. 

न्यू पॅलेसचा गणपती
सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगा घाटावर न्यू पॅलेसमधील छत्रपती घराण्याच्या गणपतीचे लवाजम्यासह विसर्जनासाठी आगमन झाले. महापालिकेतर्फे ठेवलेल्या काहिलीत मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. तुळजाभवानी मंदिर, खजिन्यावरच्या बाप्पांचेही पर्यावरणपूरक विसर्जन झाले. 

सामूहिक भोजनाची परंपरा
पंचगंगा घाटावरील गर्दीतही परीट घाटाच्या बाजूला जागा शोधून गौरी विसर्जन केल्यानंतर झिम्मा-फुगडीचा फेर आणि सामूहिक भोजनाची परंपरा काही महिलांनी आवर्जून जपली.

रंकाळा तलाव - इराणी खणीला पसंती

‘बाप्पा मोरया’च्या गजरात, रंकाळा तलावात आज गणेशमूर्ती विसर्जन झाले. रंकाळा तलावात विसर्जन करण्यापेक्षा इराणी खण येथे मोठी गर्दी झाली. मूर्तिसंकलित उपक्रमासही चांगला प्रतिसाद मिळाला. रंकाळा चौपाटी, संध्यामठ, राजे संभाजी तरुण मंडळ, दत्तोबा तांबट कमान, इराणी खण येथे विसर्जनाची व्यवस्था होती. दान केलेल्या मूर्तींसाठी महापालिकेने ट्रॅक्‍टरची व्यवस्था केली. सायंकाळी पाचनंतर गर्दी होण्यास सुरवात झाली. ब्लू ग्रीन अलगीमुळे रंकाळ्याचे पाणी हिरवे झाल्याने लोकांनी इराणी खाणीला पसंती दिली. रंकाळा चौपाटी येथे स्वतंत्र व्यवस्था होती. विद्यापीठ हायस्कूलची हरितसेना, केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मूर्ती पाण्यात विसर्जित न करता, दान करण्याचे आवाहन केले. राजे संभाजी तरुण मंडळाने काहिलीची व्यवस्था केली.

तांबट कमान येथे सायंकाळी सहानंतर गर्दी झाली. निर्माल्य पाण्यात विसर्जन न करता कुंडात टाकण्यास प्राधान्य दिले गेले. ढोल-ताशांचा कडकडाट, बाप्पा मोरयाचा गजर अशा उत्साही आणि चैतन्यदायी वातावरणात विसर्जन झाले. खंडोबा देवालय महिला मंडळाने भाविकांसाठी आंबीलची व्यवस्था केली. इराणी खाणीत दरवर्षी मोठ्या मूर्तीना प्राधान्य दिले जाते; मात्र रंकाळ्याच्या प्रदूषणात भर पडू नये यासाठी सानेगुरुजी वसाहत, रंकाळ्याच्या पिछाडीचा भाग, संतोष कॉलनी, लगतची उपनगरे, देवकर पाणंद परिसर येथील नागरिकांनी इराणी खाणीस पसंती दिली.

महापालिकेने याच खाणीत दान केलेल्या मूर्ती विसर्जित केल्या. बाप्पांच्या सामुदायिक आरतीत अख्खे कुटुंब सहभागी झाले. काहींनी गल्लीबोळातील गणपतींची मिरवणूक काढून सामुदायिकपणे विसर्जन केले. 

महापालिकेची चोख व्यवस्था
रात्री नऊपर्यंत सहा हजारांहून अधिक मूर्ती विसर्जित केल्या गेल्या. संकलित केलेल्या मूर्ती विसर्जित करण्याची जबाबदारी महापालिकेने उचलली. यात दान केलेल्या मूर्तींची संख्याही मोठी होती. पंचगंगा नदीनंतर रंकाळा तलावात मूर्तीचे मोठ्या संख्येने विसर्जन होते. रात्री वाजत-गाजत मोठ्या मंडळांच्या मूर्तीचेही विसर्जन झाले. इराणी खणीसह रंकाळ्याच्या परिसरात महापालिकेने विद्युतझोताची व्यवस्था केली. कर्मचारी रात्री उशिरापर्यंत थांबून होते.

उपनगरे - उपनगरातही प्रबोधनाचा जागर

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास शहरातील उपनगरांत उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला. ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक-युवतींनी पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्ती विसर्जित करण्यासाठी पुढाकार घेतला. जरगनगरमधील काहिलीत रात्री आठपर्यंत सहाशे मूर्तींचे विसर्जित झाले.

त्यांचे संकलन महापालिकेतर्फे करण्यात आले. परिसरातील शेती फार्ममधील तलावातही मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेचे दहा कर्मचारी येथे सकाळपासूनच मूर्तींचे संकलन करण्यासाठी थांबून होते. रामानंदनगर, जरगनगर, अक्कलकोटनगर, पाचगाव, गुरुकृपा कॉलनी, पोवार कॉलनी, जाधव पार्क, बालाजी पार्क परिसरातील नागरिकांनी तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी गर्दी केली होती. महिलांनी निर्माल्य तलावात विसर्जित न करता ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले.

नगरसेवक सुनील पाटील, संतोष नरसिंगे, रोहित पवार, प्रकाश वडगावकर, अतुल खाडे, वृषभ पाटील, सुहेल नायकवडी, धनाजी घाडगे, लखन खन्नूरकर हे मूर्ती संकलनासाठी कार्यरत होते. 

महालक्ष्मीनगर परिसरातील गंजीवली खणीत मूर्तीं विसर्जित करण्यासाठी महालक्ष्मीनगर, मंडलिक गल्ली, सुबराव गवळी तालीम, पाटाकडील तालीम परिसरातील नागरिकांची दुपारी तीननंतर रीघ लागली.

बाप्पांवर चिरमुऱ्याची उधळण करत येथे नागरिक येत होते. काही जण उत्स्फूर्तपणे मूर्ती महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करत होते. सायलेंट ग्रुपचे कार्यकर्ते खाणीत मूर्ती विसर्जित करण्यासाठी काहिलीत होते. मूर्ती घेऊन ते खाणीच्या मध्यभागी विसर्जित करत होते. पाचपर्यंत २८ मूर्तींचे संकलन झाले होते. रात्री आठपर्यंत हा आकडा २९० पर्यंत पोचला.

जवाहरनगर, सुभाषनगर, फुलेवाडी, रायगड कॉलनी, गणेश कॉलनीतील नागरिकांनी ठिकठिकाणच्या विहिरींत मूर्तीचे विसर्जन केले. आर. के. नगरमधील नागरिकांनी राजाराम तलावाकडे मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सकाळपासूनच हजेरी लावली होती. पोस्टल कॉलनी, रघुनाथ देसाईनगर, मोरेवाडी येथील नागरिकसुद्धा विसर्जनासाठी तलावावर आले होते.

कोटीतीर्थ तलाव - विद्यापीठ, स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

‘गणपती बाप्पा मोरयाऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या गजरात कोटीतीर्थ तलावात गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने आज विसर्जन झाले.

गणेशभक्तांनी हजारो मूर्ती येथे पर्यावरणपूरक विसर्जित केल्या. महापालिका कर्मचारी, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी, झंवर उद्योगसमूह व कॅसलच्या स्वयंसेवकांनी मूर्ती संकलित करण्यासाठी केलेले प्रयत्न सफल ठरले.  

महापालिकेचे दहाहून अधिक कर्मचारी, पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे साठ विद्यार्थी, झंवर व कॅसलच्या स्वयंसेवकांची सकाळपासूनच तलावावर हजेरी होती. दुपारी तीननंतर तलावावर गणेशभक्तांची मूर्ती विसर्जित करण्यासाठी गर्दी झाली. तलावावर येणाऱ्या गणेशभक्तांना पर्यावरणपूरक विसर्जनाचे आवाहन विद्यार्थी व स्वयंसेवकांतर्फे केले. बहुतांशी भक्त मूर्ती काहिलीत विसर्जित करून दान करत होते. दुपारी चारपर्यंत येथे १२५ मूर्ती दान करण्यात आल्या. त्यानंतर हा आकडा वाढत गेला. सायंकाळी साडेसातपर्यंत तो नऊशेपर्यंत पोचल्याचे महापालिकेचे कर्मचारी कुमार शिरदवाडे यांनी सांगितले. महिला व तरुणींनी निर्माल्य तलावात विसर्जित न करता ट्रॉलीमध्ये ठेवण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचबरोबर तलावाच्या नारायणदान मठाकडील मूर्तींचे दान झाले. रात्री साडेसातपर्यंत सुमारे ४६० मूर्तीं संकलित झाल्याची माहिती कर्मचारी राजू गवळी यांनी दिली.

यादवनगर, उद्यमनगर, राजारामपुरी, शाहू मिल कॉलनी, शास्त्रीनगर, वाय. पी. पोवारनगर, जवाहरनगर, सागरमाळ, प्रतिभानगर परिसरातील नागरिक मूर्तींच्या विसर्जनासाठी रात्री उशिरापर्यंत येत होते. 

पर्यावरणशास्त्र अधिविभागातील प्रा. आसावरी जाधव, प्रा. पल्लवी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मूर्ती दान करण्यासाठी भक्तांना केलेल्या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. तीन काहिलींमध्ये मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. राजारामपुरीतील जगदाळे हॉलच्या परिसरात महापालिकेतर्फे मूर्ती विसर्जित करण्यासाठी काहिली ठेवल्या होत्या. राजारामपुरीतील नागरिकांनी या काहिलीत मूर्तींचे विसर्जन केले. 

जे.एम.एम. ग्रुपचा आदर्श
जे.एम.एम. (जिद्द, मेहनत, मैत्री) या ग्रुपतर्फे सायबर चौकात काहिलीत विसर्जनाची सोय करण्यात आली. एमबीएचे बहुसंख्य विद्यार्थी असलेल्या या विद्यार्थ्यांनी गेली चार वर्षे हा उपक्रम चालू ठेवला आहे. आज सायबर चौकात राबवलेल्या उपक्रमास लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी वृक्षप्रेमी प्रतीक बावडेकर यांच्या वतीने सर्वांना विविध रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे कुणाल देसाई, मंदार आरवाडे, हरिश श्रेष्ठी, अजित संकपाळ, हेमंत काशीद, अनिकेत साळोखे, शीतल चौगुले, अजिंक्‍य पाटील यांनी आयोजन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news ganpati visarjan