कबूल है...नहीं नहीं नहीं : अभिजीत बिचुकले

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 26 जून 2019

न्यायालयीन प्रक्रिया लवकरच पुर्ण हाेईल आणि अभिजीत बिचुकले पून्हा बिगबाॅस मराठी 2 मध्ये एंट्री मारतील असा विश्वास त्याचे वकील शिवराज धनवडे यांनी व्यक्त केला आहे. 
 

सातारा : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले याने त्याच्यावरील खंडणी मागण्याचा आरोप आज (बुधवार) नाकारला. सातारा न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळंबा कारागृहात बिचुकलेची आरोप निश्‍चिती करण्यात आली. न्यायाधिशांनी बिचुकलेस खंडणीच्या आरोपाबाबत विचारले असता त्याने गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले. 
धनादेश न वठल्याप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बिचुकलेला पोलिसांनी 2012 मध्ये दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. त्यात त्याला शनिवारी (ता.22) न्यायालयीन कोठडी मिळाली. सोमवारी (ता. 24) या प्रकरणात त्याच्या वतीने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्याची सुनावणी उद्या (गुरुवार, ता.27) आहे.
दरम्यान मंगळवारी त्याचे वकील ऍड. शिवराज धनवडे यांनी खंडणीच्या गुन्ह्यातील खटल्यात आरोप निश्‍चिती करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. त्यास न्यायालयाने संमती दिली हाेती. त्यानूसार आज (बुधवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळंबा कारागृहात बिचुकलेची आरोप निश्‍चिती झाली. बिचुकलेने गुन्हा कबूल नसल्याचे न्यायाधिशांना सांगितले. आता आरोप निश्‍चिती झाली आहे. तसेच फिर्यादी फिराेज पठाण हे देखील बिचुकलेंची बिगबाॅस मराठी 2 मध्ये पून्हा एंट्री व्हावी यासाठी फिर्याद मागे घेण्याच्या तयारीत आहेत. यामुळे खंडणीच्या गुन्ह्याचा तातडीने निकाल होणार का, याची उत्सुकता लागली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Bichukale Denies In Exortion Case