अभिजीत बिचुकले उद्या आरोप मान्य करणार ?

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 25 जून 2019

उद्या (बुधवार)  सकाळी अकराच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिचुकलेची आरोप निश्चिती होईल अशी शक्यता आहे.

सातारा : बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले याच्या वरील खंडणी प्रकरणातील आरोप निश्चितीसाठी व्हिडिओ कॉनफरन्स घ्यावी असा अर्ज ऍड.शिवराज धनवडे यांनी आज (मंगळवार) न्यायालयात सादर केला आहे. 
बिचुकले यास शनिवारी (ता.२३) न्यायालयीन कोठडी मिळली. सोमवारी (ता.२४) या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्याच्या सुनावणीच्या तारीख २७ जून देण्यात आली. दरम्यान सातारा येथून बिचुकले याची रवानगी कळंबा (कोल्हापूर) कारागृहात करण्यात आलीे. फिर्यादी फिरोज पठाण यांनी त्याच्या वकिलांकडून सदरील तक्रार मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. साताराचे कलावंत मोठे होणार असतील तर त्याला आमचे सहकार्य असेल असे पठाण यांनी सोमवारी दुपारी नमूद केले. 
हे प्रकरण आजच्या बोर्डावर पुन्हा यावे यासाठी बिचुकले याची आरोप निश्चितीसाठी
ऍड धनवडे यांनी अर्ज केला. त्यात न्यायालयास व्हिडिओ कॉन्फरन्सची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सरकार पक्षाचे म्हणणे मागविले. सरकार पक्षाने आरोप निश्चिती करण्यासाठी ना हरकत असल्याचे नमूद केले. परिणामी न्यायालयाने संमती दिल्याने उद्या (बुधवार)  सकाळी अकराच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिचुकलेची आरोप निश्चिती होईल अशी शक्यता आहे. 
दरम्यान आजही बिचुकलेबाबतचे कामकाज ऐकण्यासाठी न्यायालयात त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhijeet Bichukale Exortion Case