यहाँ के हम सिकंदर....

यहाँ के हम सिकंदर....

राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे येथील हौशी कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ. अनेक अडचणींचा सामना करीत कोल्हापूर केंद्र सुरू करण्यात यश आलं आणि याच केंद्राने हाउसफुल्ल स्पर्धा कशी असते, याची प्रचीती संपूर्ण राज्याला दिली. यंदाच्या स्पर्धेचे बिगुल वाजले असून, ६ नोव्हेंबरपासून स्पर्धेला प्रारंभ होईल. यंदाच्या स्पर्धेची बहुतांश धुराही यंगस्टर्सकडेच राहणार असून, काही जण पहिल्यांदाच रंगमंचावर एन्ट्री करणार आहेत; तर काही जण पहिल्यांदाच बॅकस्टेज सांभाळणार आहेत. अशाच काही युवा रंगकर्मी व तंत्रज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला. 

यळगूड ते स्पर्धा व्हाया किर्लोस्कर..!
सचिन वाडकर हा मूळचा यळगूड (ता. हातकणंगले) गावचा. नाटकाविषयी तशी फारशी पार्श्‍वभूमी नाही. पण, एका एकांकिकेत त्याने काम केलेले. फिनिक्‍स क्रिएशन्स ही संस्था मुळातच तरुणाईचं टॅलेंट पारखून त्यांना व्यासपीठ मिळवून देणारी संस्था. ही संस्था यंदा प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचं ‘शांतता कोर्ट चालू  आहे’ नाटक सादर करणार आहे. या नाटकात तो ‘कर्णिक’ साकारणार आहे. ‘आयटीआय’चं शिक्षण पूर्ण करून तो सध्या किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीत नोकरीला आहे.

गेल्या वर्षी संधी चुकली होती...
धनश्री कोरगावकर भारती विद्यापीठात ‘एमबीए’ करीत आहे. अनेक सौंदर्य स्पर्धांत तिने बक्षिसांची लयलूट केली आहे. मात्र, नाटकासाठी म्हटलं तर तसा तिचा हा पहिलाच प्रयत्न आहे. शाहीर रंगराव पाटील यांच्या शाहिरी पोवाडा कलामंचाच्या ‘सूर्यास्त’ या नाटकात ती शालन साकारणार आहे. प्रसिद्ध नाटककार जयवंत दळवी यांचं हे नाटक. अर्थातच, सराव तालमी जोरात सुरू आहेत. धनश्रीला गेल्या वर्षीच स्पर्धेत सहभागी व्हायचं होतं. एका नाटकाच्या सरावासाठी ती जायचीही. पण, राहून गेलेल्या संधीचं ती यंदा सोनं करण्यासाठी सज्ज झाली आहे.  

एकोणीसवर्षीय तरुण नेपथ्यकार
सुगुण नाट्य संस्था यंदा प्र. ल. मयेकर यांचं ‘अग्निपंख’ नाटक घेऊन स्पर्धेत उतरली आहे. या टीमच्या नाटकाचं नेपथ्य- वेशभूषा- रंगभूषा आणि सागर व सरिता बगाडे परिवार हे एक समीकरणच. त्यांचा हा वारसा पुढे नेत यंदा मुलगा सार्थक नेपथ्याची बाजू सांभाळणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात तो आर्किटेक्‍चरच्या पहिल्या वर्षात शिकतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा आणि शेवटी ज्या वाड्यात नाटक रंगते, तो वाडाच आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो. ही सारी आव्हानं नेपथ्यकार म्हणून पेलण्यासाठी सज्ज असल्याचे एकोणीसवर्षीय सार्थक सांगतो.

भूमिकेसाठी दोन महिने घेतली मेहनत
रुद्रांश ॲकॅडमी ही संस्था यंदा वादीराज लिमये या तरुण लेखकाचं ‘बिलीव्ह इन’ नाटक सादर करणार आहे. या नाटकातील ‘तनया’ शाल्वी शाह साकारणार असून, ती पहिल्यांदाच यानिमित्तानं रंगमंचावर पदार्पण करणार आहे. शहाजी लॉ कॉलेजमध्ये ती ‘एलएल.बी.’चं शिक्षण घेत असून, गेले दोन महिने ती नाटकांच्या तालमी कशा असतात, इथंपासून ते सर्व तांत्रिक बाबींची माहिती घेण्यात मग्न होती. दोन महिन्यांच्या या मेहनतीबरोबरच रोज दोन तास वाचनाचा सरावही तिने केला असून, नाटकाच्या तालमीत ती आता व्यस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com