#MarathaKrantiMorcha मराठा आंदोलनास पाठींबा देण्यासाठी नितेश राणे, भास्कर जाधव कोल्हापूरात

संदीप खांडेकर
Tuesday, 7 August 2018

कोल्हापूर - येथे दसरा चाैकात गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास विविध स्तरावरून पाठींबा व्यक्त आहे. आज आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, आमदार भास्कर जाधव येथे आले होते. 

कोल्हापूर - येथे दसरा चाैकात गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास विविध स्तरावरून पाठींबा व्यक्त आहे. आज आंदोलनास पाठींबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, आमदार भास्कर जाधव येथे आले होते. 

ज्याच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तो मराठा कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्हाला गाडायचेच असेल तर गद्दारांना गाडा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी आज येथे केले.

सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी आंदोलनास पाठिंबा व्यक्त करत कोणत्याही पक्षाचा रंग घेऊन आलेलो नाही तर मराठा म्हणून आलेलो आहे असे स्पष्ट केले. 

मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार नोव्हेंबरची वाट कशाला बघते ? आरक्षण द्यायचे असेल तर आताच द्या. अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल. मराठा समाजाने आपली ताकद निवडणुकीत मतांमधून दाखविण्यास तयार राहावे

- नितेश राणे, आमदार

श्री. राणे म्हणाले, "आरक्षणासाठीचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे. असे असताना मराठा तरुणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांचे भविष्य अंधारात लोटले जात असल्याने त्यांचा उद्रेक होणे अटळ आहे. उलट, तोडफोड करण्यात भलतेच घटक पुढे आहेत. आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. त्यांनी विलंब न लावता आरक्षणाचा अध्यादेश काढावा. राज्यात तरुणांच्या आत्महत्या सुरू आहेत. हे राज्य हिताचे लक्षण नाही. नारायण राणे यांचा द्वेष बाजूला ठेवून त्यांनी दिलेल्या अहवालाचा अभ्यास करावा. केतन तिरोडकरला याचिका मागे घ्यायला सांगावे."

आमदारांनी राजीनामा न देता विधिमंडळात कायदा सक्षम बनत आहे का, हे तपासावे. मैदान सोडून जाऊ नये. छत्रपतींनी आपल्याला ते शिकवलेले नाही. युद्ध जिंकेपर्यंत आता माघार घ्यायची नाही.

- नितेश राणे, आमदार

मराठा आरक्षणासाठी दिल्ली ते महाराष्ट्रापर्यंत सुरू झालेल्या बैठका हा मराठा समाजाचा मोठा विजय असल्याचे सांगत श्री राणे म्हणाले, "मागासवर्गीय आयोग आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणा करत असेल तर कॅबिनेटला आयोगाला 'ओव्हरलूक' करण्याचा अधिकार आहे. त्यासाठी सरकारकडे इच्छाशक्ती हवी. सरकारने वेळेत आरक्षण दिले तर ठीक अन्यथा मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात उतरू." 

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी राजकीय त्याग करु असा इशारा देत मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी आपल्या जिभेवर लगाम लावावा. श्रेय कोणाला यापेक्षा आरक्षण मराठ्यांना हीच आमची भूमिका आहे

- भास्कर जाधव, आमदार 

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास त्यांनी आज पाठिंबा दिला. त्यावेळी आमदार भास्कर जाधव बोलत होते.

श्री. जाधव म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठीची ही अंतिम लढाई आहे. केवळ शाब्दिक नव्हे तर आरक्षण मिळविण्यासाठी माझा सक्रिय सहभाग असेल. उच्चशिक्षण घेऊनही मराठा समाज अडचणीत आहे. आर्थिक दृष्ट्या समाजाची ससेहोलपट होत आहे. आरक्षणाचे श्रेय घ्यायचे असेल तर खुशाल घ्या. आम्ही तुमचे अभिनंदन करू. आरक्षण मिळाले नाही तर राजकीय त्याग करण्याची आमची तयारी आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marath Kranti Morcha Nitesh Rane, Bhaskar Jadhav Visit