#MarathaKrantiMorcha म्हसवेत मराठा आरक्षणासाठी नदीत उतरून आंदोलन

धनाजी आरडे
Wednesday, 8 August 2018

गारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली.

गारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली.

गारगोटीत सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा दहावा दिवस होता.  आंदोलनकर्त्यांनी आज आमदार प्रकाश आबिटकर व भाजप कार्यालयावर मोर्चा काढला.            

आकुर्डेत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून चक्काजाम केला. म्हसवेत ग्रामस्थांनी वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. सकाळी ११ वाजता म्हसवे ग्रामस्थांनी गारगोटी - म्हसवे दरम्यान असलेल्या वेदगंगा नदीतील पाण्यात प्रवेश केला. आंदोलकांनी पाण्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. येथे आंदोलकांची संख्या मोठी असल्याने त्यांना रोखताना प्रशासनाची  दमछाक झाली.  प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन यांत्रिकी बोटी, दहा जीवरक्षक आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला होता.

आंदोलनस्थळी तहसिलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कदम, पोलिस निरीक्षक उदय डुबल उपस्थित होते.

भुदरगडमध्ये विविध ठिकाणी आंदोलन - 

  • गारगोटीत आज ठिय्या आंदोलनस्थळी तालुक्यातून आलेले ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
  • खानापूर ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला.
  • आकुर्डेत ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन केले.
  • महालवाडीत ग्रामस्थांनी मोटरसायकल रॅली काढली.
  • विद्यार्थ्यांनी स्केटिंग रँली काढून आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha agitation in Bhudargad Taluka