
सांगली - राज्य सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात आजपासून तालुक्यांसह विविध गावात बेमुदत धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली.
सांगली - राज्य सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात आजपासून तालुक्यांसह विविध गावात बेमुदत धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली.
सांगली शहरातील जुन्या स्टेशन रोडवरील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यानजिकच्या जागेत आंदोलन सुरु झाले आहे. "मराठा आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतोय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाही,' आदी घोषणांनी हा परिसर दणाणून गेला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील झरे व घरनिकी येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. आरक्षणासाठीचे आंदोलन अहिंसक मार्गाने करण्याची घोषणा क्रांती मोर्चाने केली आहे. एस. टी, शासकीय मालमत्तेचे नुकसान कोणीही करू नये असे आवाहन केले आहे. सांगलीसह जिल्ह्यात होणारा क्रांतिदिनीचा बंदही शांततेच करण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालय, पाच-दहा हजार लोकसंख्येवरील गावात ग्रामपंचायतींसमोरही आज धरणे आंदोलन झाले. मराठा क्रांतीचे समन्वयक डॉ. संजय पाटील, उत्तम साखळकर, अमोल सूर्यवंशी, प्रदीप पाटील, अजयकुमार देशमुख, प्रशांत पवार, रोहित दिंडे, शहाजी भोसले, अमोल सुर्यवंशी, किर्तीराज बर्गे आदी प्रमुख सहभागी झाले होते.