कोल्हापुरी परंपरेची आजही जपणूक करणारा सोहळा

सुधाकर काशिद
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

कोल्हापूरचा दसरा सोहळा कोल्हापूर आणि संस्थानकालीन कोल्हापूर यांच्यातला नात्याचा धागा खूप जुना आहे; पण तो मोलाचा आहे. किंबहुना कोल्हापूरच्या परंपरेची ती सर्वांनी मिळून केलेली जपणूक आहे....

कोल्हापूरचा दसरा सोहळा कोल्हापूर आणि संस्थानकालीन कोल्हापूर यांच्यातला नात्याचा धागा खूप जुना आहे; पण तो मोलाचा आहे. किंबहुना कोल्हापूरच्या परंपरेची ती सर्वांनी मिळून केलेली जपणूक आहे....

संस्थान खालसा झाले. राजा ही उपाधी राहिली आहे. प्रजेची ओळख शहरवासी अशी झाली असली तरीही कोल्हापुरात दसऱ्याचा दिवस मात्र आजही आपल्या सोबत ऐतिहासिक सुवर्णाकृतीची किरणे घेऊनच उजाडतो, तो निव्वळ परंपरेमुळेच. या दिवशी जुना राजवाडा, नवीन राजवाडा, दसरा चौक हा सारा परिसर नव्याने ताजातवाना होतो आणि दरबारी संस्थानकालीन स्मृतीचा साज लपेटून घेत हा दिवस मावळतो. जणू हा दिवस कोल्हापूर आणि संस्थानकालीन कोल्हापूर यांच्यातला नात्याचा धागा आणखी घट्ट करतो. विशेष हे की, कशाला काय जुने घेऊन बसायचं, असं म्हणणाऱ्या नव्या पिढीलाही हा सोहळा आपल्यात सहभागी करून घेतो.

कोल्हापूर आताचे शहरवजा एक मोठे गावच. शिवरायांची सून खुद्द ताराराणी महाराणींनी स्थापन केलेली करवीर संस्थानची राजधानी. त्यामुळे साहजिकच संस्थानकालीन प्रथा, परंपरांचा या शहरावर पगडा. ताराराणींच्या नंतर इतर राजवटी या शहराने अनुभवल्या आणि तत्कालीन परिस्थितीत ज्या ज्या परंपरा होत्या, त्या आस्थेने जपल्या. दसऱ्याचा सोहळा ही अशीच एक कोल्हापूरची परंपरा. पूर्वी हा दसरा सोहळा त्र्यंबोली टेकडीच्या परिसरात होत होता, अशा नोंदी आहेत. त्यानंतर आताच्या दसरा चौकात म्हणजे त्यावेळच्या चौकातल्या माळावर हा सोहळा सुरू झाला.

हा चौफाळ्याचा माळ म्हणजे या माळावर पांढऱ्या चाफ्याची थंडगार सावली. आज सर्वात महत्त्वाच्या असलेल्या या चौकात खूप वर्दळ असते; पण त्या काळी तो एक 
निवांत माळ. या माळावर दसऱ्याचे सोने लुटण्याची परंपरा सुरू झाली; पण सोने लुटायला येण्यापूर्वी भवानी मंडपातून छबीना (लवाजमा) मिरवणूक निघू लागली. ही मिरवणूक म्हणजे एक प्रकारे संस्थानच्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन. सायंकाळी मंडपातून ही मिरवणूक सुरू व्हायची. अग्रभागी हत्तीवर करवीर संस्थानचा ध्वज, त्यामागे सरदार मानकरी, हत्तीवर अंबारीत महाराज, शस्त्रे हातात घेऊन सहभागी झालेले सेवक, एका गाडीवर चक्‍क डोळे बांधलेले चित्ते, एकाच्या हातावर डौलाने बसलेले बहिरे ससाणे, खणखणीत डफ वाजवणारे शाहीर, अधून-मधून ठासणीच्या बंदुकीने फैरी झाडणारे बंदूक भालदार, सनई चौघडा असा हा लवाजमा दसरा चौकात येत असे. तेथे शमीच्या पानाचे पूजन राजे करत. बंदुकीच्या फैरी झडल्या की करवीरवासीय आपल्यातील रांगडेपणाचे प्रदर्शन करत सोने लुटत. क्षणभरच हा रांगडेपणा; पण त्यानंतर एकमेकांच्या गळ्यात गळा घालून दसऱ्याच्या शुभेच्छा देत असत. आताही हा लवाजमा आहे. त्यात पारंपरिकता जपण्याचा प्रयत्न आहे.

आता महाराज हत्तीवरून नव्हे तर मेबॅक या जुन्या ऐतिहासिक मोटारीतून दसरा चौकात येतात. आता शाहू छत्रपती, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, युवराज शहाजी छत्रपती, युवराज यशराजे छत्रपती दसरा चौकात शमीच्या पानाचे पूजन करतात व त्यावेळी करवीर संस्थानच्या गीताची धून पोलिस वाद्यवृंदाच्या वतीने सादर केली जाते. या सोहळ्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, मान्यवरांना निमंत्रित केले जाते.

या सोहळ्यानंतर महालक्ष्मीची पालखी मंदिराकडे परत जाताना सिद्धार्थनगर, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ परिसरातून जाते. तर शाहू संभाजी व मालोजीराजे भवानी मंडपात जाऊन जनतेकडून दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकारतात.हा सोहळा खूप जुना आहे; पण मोलाचा आहे. किंबहुना कोल्हापूरच्या परंपरेची ती सर्वांनी मिळून केलेली जपणूक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur news dasara tradition