या संचारबंदीच्या काळात अभिनेते शरद भुताडिया करत तरी काय आहेत...? चला जाणुन घेवू.... 

संदीप खांडेकर
सोमवार, 30 मार्च 2020

अभिनेते शरद भुताडिया यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्यांच्या वामकुक्षीची वेळ ‌डिस्टर्ब झाली. तक्रारीचा सूर न ‌करता ते ‌बोलते‌ झाले. वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यांच्या ‌अंगातला उत्साह सळसळला. सूर्य नारायण उठवल्यानंतर मी उठतो, असे सांगत रात्री अंथरुणावर ‌खिळण्यापर्यंतचा दिनक्रम स्क्रिप्टवर अवतरला. नाटकांचे वाचन, पत्नीला मदत ते क्लासिक मुव्ही पाहण्यासाठीचे ‌घड्याळाच्या‌ काट्यावरील प्लॅनिंग ‌उलगडत गेले. घरी बसून कंटाळा कसला ? वेळेचा सदुपयोग केला म्हणजे झालं, हे त्यांच दिलखुलास उत्तर...

शरद भुताडिया सरांचा डॉक्टरी पेशा. बेमिसाल अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची त्यांच्या अभिनयाची ताकद. रंगमंचावर ‌त्यांचा वावरही सहज असतो. सावित्रीबाई फुले रुग्णालयात रुग्णसेवा सांभाळत त्यांनी रंगमंच गाजवले. शाहू नाक्यावरील वैभव ‌को-आॅपरेटिव्हमध्ये त्यांचा ‌ठिय्या. मोबाईलवर त्यांच्याशी ओळख सांगून दिनक्रमाची विचारणा केली. 

'मी‌ हल्ली सकाळी लवकर उठत नाही. सूर्यनारायण उठल्यावर उठतो,' त्यांच सरळ उत्तर. भुताडिया ‌सर उठल्यावर बागकामात लक्ष घालतात. झाडांना पाणी घालणे, पालापाचोळा साफ करणे, वाढलेल्या फांद्या चाटणे हे ‌त्यांच्या‌ आवडीचं काम. मुलगा सनत ‌मुंबईत राहतो. प्रोडक्शन इंजिनिअरच्या ‌कामात तो गुंतलाय
कोल्हापुरात भुताडिया सर व त्यांची पत्नी उज्ज्वला राहतात. सरांची त्र्याण्णववर्षीय आई बिनखांबी गणेश मंदिर परिसरात राहते. तिची रोज सकाळी त्यांची भेट चुकत नाही. 

कोरोनामुळे दिनक्रमातलं हे पेज रिकाम राहतयं. मोबाइलद्वारे संपर्क मात्र तुटलेला नाही.‌ बागकाम उरकल्यावर त्यांची किचनमध्ये ‌रेलचेल सुरू होते.  पत्नीला नाश्तासह ‌जेवणाच्या‌ तयारीसाठी त्यांच वर्क सुरू होतं. नाश्त्यानंतर सर पुस्तकात डोकं घालतात. रशियन लेखक स्टॅनिलाव्हस्कीच्या 'रिअलिस्टिक अॅक्टिंग' पुस्तकाच्या मराठी अनुवादाच काम त्यांनी हाती घेतलंय. मराठी‌ अभिनय सृष्टीत पुस्तक महत्त्वाचे ठरेल, यावर त्यांचा विश्वास आहे. डॉ. पी. एम. चौगुले लिखित. मानसिक समुपदेशन' पुस्तकाचे ते वाचनात स्वत:ला गुंतवून घेतात. शेक्सपिअरच्या 'दि टेंपेस्ट' नाटकाचे त्यांचे वाचन सुरू आहे. गो.‌पू. देशपांडे यांचे 'रास्ते' नाटक त्यांना वाचून संपवायच आहे. नोबेल पुरस्कार विजेते राॅबर्ट नॅश यांच्या जीवनावर आधारित 'ब्युटिफुल माइंड' चित्रपट त्यांना पाहायचा आहे. त्याची सीडी त्यांनी आणून ठेवली आहे. 

भुताडिया सरांना क्लासिक चित्रपटांशी लगाव आहे. आणखी काही चित्रपट त्यांना पाहायचे आहेत. दुपारचे दोन व वामकुक्षीनंतर त्यांच्या घराच्या परिसरात येरझाऱ्या ठरलेल्या आहेत. पाय ‌मोकळे करण्याने उत्साह वाढतो, असं त्यांचं म्हणणं. सायंकाळच्या सत्रातलं वाचनात आजही खंड पडलेला नाही. कामानिमित्त परगावी असेल तरच त्याला ब्रेक मिळतो. आता मात्र तसे घडत नाही. कोणता प्रोजेक्ट हाती नसल्याने पत्नीला अधिकाधिक मदत ‌करण्याकडे कल असल्याचे ते सांगतात. रात्रीच्या जेवणाच्या तयारीकरिता पुन्हा पत्नीला मदत करतात. जेवणानंतर पुस्तकांतील पानांवर नजर भिरभिरल्याशिवाय त्यांना झोप येत नाही. 'दिवसभराचे वेळापत्रक तयार असल्याने कंटाळा येत नाही. कोणतंही काम आवडीनं व झोकून देऊन केलं की ऊर्जा मिळते. कोरोनामुळे प्रत्येकाला कुटुंबियांशी संवाद साधायला वेळ मिळाला आहे. त्याचा ‌वापर‌ करताना माइंड क्रिएटिव्ह ठेवणं महत्त्वाचं असल्याचं सांगायला ते विसरत नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: days of curfew actress sharad bhutadiya kolhapur