पोलिसांनी लढविली नामी शक्कल; डिस्कच्या क्रमांकावरून आरोपी जाळ्यात 

लुमाकांत नलवडे
बुधवार, 22 जानेवारी 2020

ताम्हीणी घाटात मोटार कोसळली होती. मोटारीतील दोघे जळून खाक झाले होते. अपघात झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. मात्र पोलिसांना शंका आली. त्यांनी अज्ञांतावर थेट खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोटारीच्या चाकातील डिस्कमध्ये असलेल्या क्रमांकावरून तपास सुरू केला

ताम्हीणी घाटात मोटार कोसळली होती. मोटारीतील दोघे जळून खाक झाले होते. अपघात झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. मात्र पोलिसांना शंका आली. त्यांनी अज्ञांतावर थेट खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोटारीच्या चाकातील डिस्कमध्ये असलेल्या क्रमांकावरून तपास सुरू केला आणि तेंव्हा मयत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व आरोपी रायगड जिल्ह्यातील आणि खून पुणे जिल्ह्यात केल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी केवळ चार दिवसांत पाच आरोपींना अटक केली. पौड (ता. मुळशी. जि. पुणे) येथील पोलिसांनी हा तपास केला. 

"मुळशी पॅटर्न' या चित्रपटावरून मुळशी आणि तेथील गुन्हेगारी जगत सर्वज्ञात आहे. याच मुळशी तालुक्‍यातील ही घटना आहे. पौड या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताम्हीणी घाट आहे. या घाटात साधारण सहा-सात महिन्यापूर्वी एक मोटार कोसळली होती. ती जळाली होती. याच मोटारीत दोघे जळून खाक झाले होते. अपघात झाल्याची वर्दी पोलिस ठाण्यात आली. पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी परस्थिती पाहून त्यांनी हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट केले. कारण मोटार दरीत कोसळताना आतील दोघांनीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. अपघातावेळी ज्या घटना दिसून येतात त्या मात्र येथे दिसत नाहीत आणि स्थानिक पोलिस पाटलची फिर्याद घेतली. अज्ञात मयतांचा अज्ञात आरोपींनी खून केल्याची फिर्याद दाखल झाली. मयत कोण माहिती नाहीत, आरोपी कोण माहिती नाही तरीही खूनाचा गुन्हा दाखल झाला. तपास करणे अवघड होते. निरीक्षक धुमाळ यांना पोलिस उपअधीक्षक सई भोरे-पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि तपास सुरू झाला. 

हे पण वाचा -  धक्कादायक; गाळ्याला बाहेरून कुलूप; आत चालायचे अश्‍लील चाळे

मोटारीच्या प्रत्येक चाकाच्या आतील डिस्कमधील एक क्रमांक मिळवला. मोटारीच्या संबंधित कंपनीकडे पाठवली. मोटार कोठे रजिस्ट्रेशन झाली याची माहिती घेतली. तेंव्हा ही मोटार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एजन्सीचा क्रमांक मिळाला. यावरून पोलिसांनी थेट एजन्सीज्‌ गाठली. तेथून मोटार कोणाची याचा पत्ता मिळविला. तेथे भंगार व्यवसाय करणारे दोघे बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मयतांची ओळख पटली. त्यांनी दोघांची माहिती घेतली तेंव्हा दोन दिवसांपूर्वीच हे दोघे एका व्यापाऱ्याने बोलविले म्हणून गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनस्थाळावरून उलट दिशेला तपास सुरू केला.

हे पण वाचा - कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी; तरूण शेतकऱ्याची आत्महत्या 

ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. तेंव्हा एका रविवारी ही मोटार तेथून जाताना दिसून आली. पोलिसांनी हाच मुद्दा पुढे तपासात केंद्र बिंदू ठेवला. मोबाइल लोकेशनवरून त्यांना कोणकोण भेटले. त्यांचा प्रवास कसा झाला. सीडीआरमुळे त्यांच्याशी कोणकोण बोलले होते. याची माहिती घेतली. त्यावरून रायगड जिल्ह्यातील काही व्यावसायिकांशी त्यांचा वारंवार कॉल झाल्याचे दिसून आले. रायगडमध्ये त्यांचा शोध घेतला असता ते बेपत्ता होते. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्यावर निश्‍चित झाली आणि अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून पोलिसांनी त्यांना अटक केली. 

हे पण वाचा -  ...तर त्या महिला घेणार जलसमाधी

व्यवसायातील देण्याघेण्याच्या कारणावरून रायगड मधील पाच जणांनी त्या दोघांचा खून केल्याची माहिती उजेडात आली. त्यांनी दोघांना मारून मोटार घाटात ढकलली होती. मात्र ती मोटार घाटातील रस्त्यांवरून दिसत असल्यामुळे पुन्हा शेजारील गावातून पेट्रोल आणून त्यांना मोटारीसह जाळले होते. असे तपासात पुढे आले. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दाखवलेली समयसुचकता आणि अनुभव यामुळे केवळ चार दिवसांत अपघात दिसत असलेला खून उजेडात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police investigation for murder on car desk number