सरकारचीच फसवणूक ; किसान योजनेत १३ हजार लाभार्थी अपात्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

१३ कोटी ४० लाखांच्या वसुलीचे प्राप्तिकरचे निर्देश

कोल्हापूर : पंतप्रधान किसान योजनेचा जिल्ह्यातील १३ हजार ६०९ शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ उठविल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांकडून १३ कोटी ४० लाख ८२ हजार रुपये तत्काळ वसूल करावेत, असे निर्देश प्राप्तिकर विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांची यादीच प्राप्तिकराने विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविली आहे. दरम्यान, शेजारील सांगली जिल्ह्यातही असाच प्रकार घडला आहे. तेथे १४ हजार २६७ शेतकऱ्यांकडून १० कोटी ४६ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

 

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान दिले जाते. वार्षिक उत्पन्न नगण्य असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नियम आहे; मात्र या योजनेचा लाभ प्राप्तिकर भरणाऱ्यांनीही घेतला होता. त्यामुळे शासकीय निधी चुकीच्या लाभार्थींकडे जात असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या पडताळणी लक्षात आले. त्यामुळे चुकीच्या पध्दतीने व नियमांचे उल्लंघन करून लाभ घेणाऱ्यांकडून रक्कम पुन्हा वसूल केली जाणार आहे.

यामध्ये, सर्वाधिक २२०९ हातकणंगले तालुक्‍यातील तर सर्वाधिक कमी म्हणजे १५८ शेतकरी गगनबावडा तालुक्‍यातील आहेत. प्राप्तिकर विभागाने प्रधानमंत्री किसान योजनेचा असा गैरलाभ घेणाऱ्यांच्या याद्या ज्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत. दरम्यान, चुकीच्या पध्दतीने लाभ मिळवणाऱ्या जिल्ह्यातील १३ हजार ६०९ जणांकडून १३ कोटी ४० लाख ८२ हजार रुपये तत्काळ वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत

हेही वाचा - लाभांश वाटपाबाबत सहकारी संस्था संभ्रमात -
अशी होणार वसुली :

वसुलीसाठी शासकीय स्तरावर नवीन बॅंक खाते काढले जाणार. यामध्ये अपात्र, मृत, चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवलेल्या शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करून भरली जाणार आहे. जमा होणाऱ्या रकमेचे स्वतंत्र कॅशबुक ठेवले जाणार आहे. रक्कम वसूल करताना एक अर्ज दिला जाणार आहे. यामध्ये संबंधितांचे नाव, जिल्हा, ओळख क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, आर्थिक वर्ष, वसूल होणारी रक्कम अशी माहिती भरून घेतली जाणार आहे. 

तालुका*  एकूण लाभार्थी  गैर लाभ घेणारे
शाहूवाडी* ३६८०३  * ६८८
पन्हाळा* ५१७३० * १०८९
हातकणंगले* ५८२३२ *२२०९
शिरोळ* ४९५९५  * १४६६
करवीर* ७०३०० * १८९२
गगनबावडा* ७४६६ * १५८
राधानगरी*५१५२१ * १०२४
कागल* ५१२१२ * ११४२
भुदरगड* ३५९३२ * ८८२ 
आजरा* ३१८६५ * ८७२
गडहिंग्लज* ४९७२८ * १०६४
चंदगड* ४२६३७ * ६१० 
एकूण* ५४९३०७ 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 thousand beneficiaries in PM Kisan Yojana ineligible