कागलमध्ये 174 जणांचा होमक्वारंटाईन वाढविला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कागल नगरपरिषदेने प्रभावी आणि जलद उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. शहरातील 10 हजार पाचशे मिळकतींचा दोन वेळा सर्व्हे केला आहे. मार्च महिन्यात 24 ते 26 तारखेदरम्यान सर्वेक्षण करून 20 तारखेनंतर बाधीत शहरातून आणि राज्यातून आलेल्या 373 लोकांना होमक्वारंटाईन केले आहे. त्यातील 174 जणांचा होमक्वारंटाईन कालावधी 28 एपिलपर्यंत वाढविण्यात आला आहे.

कागल : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कागल नगरपरिषदेने प्रभावी आणि जलद उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. शहरातील 10 हजार पाचशे मिळकतींचा दोन वेळा सर्व्हे केला आहे. मार्च महिन्यात 24 ते 26 तारखेदरम्यान सर्वेक्षण करून 20 तारखेनंतर बाधीत शहरातून आणि राज्यातून आलेल्या 373 लोकांना होमक्वारंटाईन केले आहे. त्यातील 174 जणांचा होमक्वारंटाईन कालावधी 28 एपिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. औषध फवारणी करून शहर आणि उपनगरांचे एक वेळ निर्जंतुकीकरण केले आहे. आता दुसऱ्यांदा हे काम हाती घेण्यात आले आहे. शहराचे सहा झोन करून ते बंदिस्त करण्यात आले आहेत. 

सध्या देशाबरोबरच राज्य आणि कोल्हापूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. बेळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कर्नाटक सीमेलगत असलेल्या कागल शहराने उपाययोजना करत कोरोना संसर्ग शहराच्या हद्दीबाहेरच रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पालिकेने 11 एप्रिल रोजी शहराचा दुसऱ्यांदा सर्व्हे केला. यामध्ये कर्नाटकसह इतर राज्यातून कोणी आले आहे का? तसेच सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये कोणीही संशयास्पद आढळून आलेले नाही. 

साहित्य ज्या त्या ठिकाणी उपलब्ध
कोल्हापूर शहर आणि कर्नाटकातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहराचे सहा भाग करण्यात आले आहेत. नागरिकांना लागणारे साहित्य ज्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घेतली आहे. 
- नितीन कांबळे, आरोग्य निरीक्षक, कागल नगरपरिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 174 People's Home Quarantine Increased By Kagal Palika Kolhapur Marathi News