बाप रे...! सांत्वनासाठी गेल्या अन् क्वारंटाईन झाल्या 

नामदेव माने
गुरुवार, 9 जुलै 2020

या व्यक्तीच्या पत्नीचे कांचनवाडी व चाफोडीत सलोख्याचे संबंध आहेत.

कसबा बीड (कोल्हापूर) - मैत्रीणीच्या पतीचे निधन झाले म्हणून सांत्वन करण्यासाठी गेलेल्या १९ महिलांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली. त्या मधील एका महिलेची धाप वाढल्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. ही घटना कांचनवाडी (ता.करवीर) येथे घडली आहे.
  

चार दिवसापूर्वी चाफोडी (ता.करवीर) येथील एका व्यक्तीचा संशयितरित्या मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या पत्नीचे कांचनवाडी व चाफोडीत सलोख्याचे संबंध आहेत. शेतातील भांगलणी (खुरपणी) पासून छोट्यामोठ्या कामासाठी ही महिला कांचनवाडी येथे कामासाठी जात होती. 

त्यामुळे सलोख्याचे संबंध वाढले होते. ग्रामीण भागात कोणीही वारले की बोलवायला (सांत्वन) महिला बहुसंख्येने जातात. सांत्वन करताना गळ्यात गळा घालून रडतात व सांत्वन करतात अशी प्रथा आहे. पण ज्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी या महिला गेल्या होत्या. तिलाच कोरोना झाल्याचा अहवाल गावात पोहचला आणि सर्व महिलांची पाचावरधारण होऊन बसली. ही बाब आरोग्य यंत्रणेच्या लक्षात येताच तातडीने या महिलांना त्याच्या घरातून थेट कोरोना कक्षात विलगिकरण करण्यात आले.

हे पण वाचामाझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्वाचे!  संभाजीराजे छत्रपती

ग्रामीण भागात अंत्य यात्रेला, रक्षाविसर्जनला जास्त गर्दी करणे म्हणजे प्रतिष्ठा समजले जाते. ग्रामीण भागात रूढी परंपरा पाळल्या पाहिजेत. पण कोरोनाच्या काळात शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे, अशावेळी फोनवरूनच सांत्वन करा. गर्दी करू नका. ही जबाबदारी गावातील प्रतिष्ठित लोकांनी घेऊन गर्दी टाळावी.
-डॉ. मधुरा मोरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र शिरोली दुमाला.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 women quarantined in kolhapur