कर्नाटकातील 21 टन बेकायदा तांदुळ कोल्हापुरात पकडला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

हुक्केरी (जि. कर्नाटक) येथून कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर आणलेल्या 25 किलोच्या 860 बॅग म्हणजे साडे एकवीस टन तांदुळ आज अन्न, धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी जप्त केला. पिशवी वेगळी आणि आतील तांदुळ वेगळ्याप्रकारचा असून हा तांदुळ शासकीय असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

कोल्हापूर : हुक्केरी (जि. कर्नाटक) येथून कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर आणलेल्या 25 किलोच्या 860 बॅग म्हणजे साडे एकवीस टन तांदुळ आज अन्न, धान्य वितरण अधिकारी माधवी शिंदे यांनी जप्त केला. पिशवी वेगळी आणि आतील तांदुळ वेगळ्याप्रकारचा असून हा तांदुळ शासकीय असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, याबाबत शिंदे यांनी लक्ष्मीपुरी येथील निधी ट्रेडर्सच्या रामवीर शर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. 

कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाय केले जात आहेत. यापार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सिमा बंद केल्या आहेत. अत्यावश्‍यक सेवा म्हणून हुक्केरी (कर्नाटक) मधून 21 टन 500 किलो तांदूळ घेवून आलेला ट्रकची माहिती शहर पुरवठा अधिकाऱ्यांना मिळाली. मार्केट यार्डमधील पोस्टामागील मोकळ्या जागेवर हा ट्रक उभा होता.

दरम्यान, वरील पिशवी वेगळी आणि आतील तांदुळ परिमल असल्याचे आढळल्याने हा तांदुळ शासकीय असावा असा अंदाज आला. पुरवठा अधिकारी शिंदे यांनी चालकाकडून या सर्व तांदळाच्या पावत्या घेतल्या असून त्या पावत्यांची पडताळणी केली जाणार आहेत. या वेळी, सुरेश टिपुगडे, काशिनाथ पालकर, संजय गिते, बबन घोडगे आणि सतीश उपस्थित होते. 

तांदुळ वेगळा आणि पॅकिंग वेगळे 
शासकीय तांदूळ घेवून येणारा ट्रक कोल्हापूरमध्ये येत असल्याचा अनामिक फोन अन्न, धान्य वितरण कार्यालयात आला. या आधारे आमची सर्व टिम बाजार समितीमध्ये तात्काळ हजर झाली. फोनवरून दिलेल्या पत्त्यावर पाहिले असता एक ट्रक बाजार समितीतील पोस्ट कार्यालयाच्या मागे उभा होता. दरम्यान, यामध्ये असणारा तांदुळ वेगळा आणि पॅकिंग वेगळे आहे. या संशयावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
- माधवी शिंदे, अन्न, धान्य वितरण अधिकारी, कोल्हापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 21 Tonnes Of Illegal Rice Caught In Kolhapur Kolhapur Marathi News