कोल्हापूर : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत हालोंडीतील पंचवीस एकर ऊस जळून खाक 

अभिजीत कुलकर्णी 
Tuesday, 17 November 2020

 पंचवीस एकर उस व दीड एकर केळीची बाग जळून खाक झाली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे सत्तर लाख रुपये इतके  नुकसान झाले आहे

नागाव : वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये  शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत हालोंडी ( ता. हातकणंगले ) येथील  पंचवीस एकर उस व दीड एकर केळीची बाग जळून खाक झाली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे सत्तर लाख रुपये इतके  नुकसान झाले आहे.  ही घटना सोमवारी ( ता. १६ ) दुपारी एकच्या सुमारास हालोंडी - मौजे वडगाव या रस्त्यावरील निळकंठ -  कागवाडे  मळा येथे घडली.

याबाबतची मिळालेली माहिती अशी, हालोंडी येथील सुमारे  वीस शेतकऱ्यांची मौजे वडगाव रोडकडेला उसाची शेती आहे. येथील सर्वे नंबर १५७  निळकंठ - कागवाडे मळा येथे वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफाॅर्मर आहे. यामध्ये  शॉर्टसर्किट होऊन त्याला आग लागली व आगीची झळ उसाच्या फडाला लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न केले. मात्र दुपारी एकच्या सुमारास लागलेली ही आग रात्री उशिरा आटोक्यात आणण्यात यश मिळाले. यामध्ये  सुमारे २५  एकर ऊस व दीड एकर केळीची बाग जळून खाक झाली. या आगीमुळे येथील शेतकऱ्यांचे सुमारे सत्तर लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

 या नुकसानीची भरपाई वीज वितरण कंपनी द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार राजूबाबा आवळे यांच्याकडे केली आहे.  याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे  आश्वासन आमदार आवळे यांनी शेतकऱ्यांना दिले.  या घटनेचा पंचनामा हेरले मंडल अधिकारी बी.एल.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावकामगार तलाठी, वीज वितरण कर्मचारी व कोतवाल यांनी पूर्ण केला आहे.
 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 acres of sugarcane fire in kolhapur