एनडीआरएफचे 25 जवान 15 जुलैपासून कोल्हापुरकरांच्या मदतीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जुलै 2020

गेल्या वर्षी शहराला महापूराचा विळखा पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) स्वतंत्र पथक तैनात असणार आहे.

कोल्हापूर : गेल्या वर्षी शहराला महापूराचा विळखा पडल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक) स्वतंत्र पथक तैनात असणार आहे. 15 जुलै ते 31 ऑगस्टअखेर पथक येथे असेल. यात 25 जवांनाचा समावेश असेल. 

एनडीआरएफच्या पथकानेच गेल्या वर्षी कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याची पूरस्थिती हाताळली. प्रयाग चिखली, आंबेवाडी गावात पूराच्या पाण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यास या जवानांची मदत झाली. शहरात शाहूपूरी, अस्बेंली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय. खानविलकर पेट्रोल पंप ते उलपे मळा, रमणमळा या भागात मोठ्या प्रमाणावर पूराचे पाणी साचून राहिले होते. 

बापट कॅम्प, कदमवाडी परिसरालाही पूराच्या पाण्याचा फटका बसला. पूराचे पाणी वाढल्यानंतर एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यापेक्षा आधीच व्यवस्था करावी यासाठी शहरासाठी स्वतंत्र पथक मागविले जाणार आहे. त्यांची व्यवस्था महापालिकेच्या स्तरावर केली जाईल. पूराचे पाणी वाढत गेल्यानंतर जवानांचे महत्व ध्यानात येते. जिल्ह्यात तीन पथके असतील. त्यातील एक पथक शहर परिसरात तैनात असेल. संभाव्य पूरस्थितीत पाहता अग्निशमन दलाने नेहमीप्रमाणे पथके तैनात केली आहेत. त्यांच्यासोबत एनडीआरएफचे जवान असतील. गेल्या वर्षी महापूराच्या काळात अनेकांचे जीव वाचविण्यात एनडीआरएफच्या जवानांचा मोठा वाटा राहिला आहे. 

दृष्टिक्षेप 
- 15 जुलै ते 31 ऑगस्टअखेर पथक कोल्हापुरात राहणार 
- स्वतंत्र पथकाची महापालिकेने केली होती मागणी 
- एनडीआरएफ पथकाची व्यवस्था करणार महापालिका 
- अग्निशमन दलासोबत असणार एनडीआरएफचे जवान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 NDRF personnel from July 15