
पोलिसांकडून ‘मुस्कान’ अंतर्गत ३२ बालके पालकांकडे स्वाधीन
कोल्हापूर : माँ माँ, म्हणत निरागस लहान मुलगी रडत उभी होती, सर्वांच्या नजरा तिच्या रडण्याकडे होत्या. ती हरवली असावी, असा सारेच तर्क लावत होते; पण तिच्या मदतीला कोणी पुढे येत नव्हते, ही मुलगी अखेरीस पोलिसांच्या नजरेला पडली. त्यांनी चौकशी केली; पण तिला मराठी ना, ना हिंदी समजत होते. ती कोण, कुठली?, तिचे पालक कोण इथपर्यंतच्या उलघडा करण्याचे आव्हान होते.
पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले. अखेर त्या मुलीला तिचे जन्मदाते मिळाले. पोलिसांच्या १५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ती बालिका आईबापाच्या कुशीत विसावली.
दोन महिन्यांपूर्वी हरवलेली आठ वर्षाची बालिका पोलिसांना सापडली. मुस्कान ऑपरेशन अंतर्गत सहायक पोलिस निरीक्षक रूपाली पाटील यांनी तिच्या पालकांचा शोध सुरू केला. तोडक्या मोडक्या संवादावरून ती कुठली असावी, याचा अंदाज बांधला. त्यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधला; पण नोंद मिळाली नाही. बालिकेबाबतची माहिती स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती नातेवाईकांच्या नजरेत आली. त्याआधारे पाटील यांनी परप्रांतातील मुलींचा पत्ता व आई-वडिलांना शोधून काढले. तिची आई रुग्णालयात उपचार घेताना संबंधित बालिका बेपत्ता झाली होती. हे एक उदाहरण; परंतु अशा पद्धतीच्या ‘मुस्कान ऑपेरशन’द्वारे हरवलेल्या ३२ मुलामुलींना डिसेंबर २०२० मध्ये सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले.
हेही वाचा- स्थलांतरित मतदारांसाठी उमेदवारांची फिल्डिंग
बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मंदिरे अशा गर्दीच्या ठिकाणी लहान बालके हरवतात. गैर प्रकारासाठी मुलांना पळवून नेले जाते. यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ २०१५ मध्ये याची सुरवात झाली. यंदाची मोहीम पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविली. प्रत्येक ठाण्यातील १ अधिकारी व २ कर्मचाऱ्यांचे पथक नेमले. याची सर्व जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षप्रमुख उपनिरीक्षक विभावरी रेळेकर, रवींद्र गायकवाड, आनंदराव पाटील, सायली कुलकर्णी, मीनाक्षी पाटील, अश्विनी पाटील, अभिजित घाटगे, तृप्ती सोरटे यांनी यशस्वीरित्या पेलली.
डिसेंबरअखेर मुलांचा लागलेला शोध...
वर्षे शोध लागलेली बालके पळवून नेलेल्या मुलांचा शोध
मुले मुली मुले मुली
२०१९ ६३ ४० --- १४
२०२० २८ ४ १ ८
संपादन - अर्चना बनगे