इचलकरंजीत 36 कंटेन्मेंट झोन, शहराचा 35 टक्के भाग "लॉक' 

पंडित कोंडेकर 
बुधवार, 15 जुलै 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुमारे 35 टक्के शहराचा भाग आता कन्टेटंमेट झोनमध्ये आला आहे. या झोनमध्ये असणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे.

इचलकरंजी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सुमारे 35 टक्के शहराचा भाग आता कन्टेटंमेट झोनमध्ये आला आहे. या झोनमध्ये असणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. नियमानुसार कन्टेटंमेंट झोनमध्ये कोणताही उद्योग सुरु करता येत नाहीत. त्यामुळे संबंधित यंत्रमाग उद्योजक हवालदील झाले असून या उद्योगातील हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. 

यंत्रमाग उद्योग हा शहरभर पसरला आहे. अगदी दाट नागरी वस्तीतही हा उद्योग आहे. एकाच इमारतीत खालच्या मजल्यावर कारखाना व वरच्या मजल्यावर निवासस्थान अशीच रचना अनेक ठिकाणी आहे. संभाव्य कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून रुग्ण आढळलेल्या भागात कन्टेटंटमेट झोन करण्याचे काम सुरु आहे. ही संख्या सोमवारपर्यंत 36 पर्यंत पोचली होती. नियमानुसार या झोनमध्ये अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य अस्थापना सुरु ठेवता येत नाहीत. त्यामुळे अनेक यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. एकीकडे सर्वत्र उद्योग पूर्वपदावर येत असतांना इचकरंजीतील यंत्रमाग उद्योग मात्र वाढत्या कन्टेटंमेंट झोनमुळे बंद पडत चालला आहे. 

एका माहितीनुसार किमान सातशे ते आठशे छोटे - मोठे यंत्रमाग उद्योग केवळ कन्टेटंमेट झोनमुळे बंद ठेवावे लागले आहेत. यापूर्वीचा अनुभव घेता अशा झोनमधील यंत्रमाग उद्योग सुरु ठेवण्यासाठी परवनागी देण्याबाबत प्रशासन सकारात्मक नाही. या उद्योगात काम करणारे हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. कन्टेटंमेंट झोन वगळता अन्य ठिकाणी अटी व शर्थी घालून उद्योग सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. पण कन्टेंटमेंट झोनमधील यंत्रमाग उद्योग कधी सुरु होणार याबाबत अनिश्‍चीतता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रमाग उद्योजकामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

घरातील सर्वच जण बेरोजगार... 
अनेक यंत्रमाग उद्योगात घरचीच मंडळी काम करीत असतात. त्यामुळे हा कुटीरउद्योग म्हणूनही चालविला जातो. पण कन्टेटंमेंट झोनमुळे अनेक यंत्रमाग उद्योग बंद ठेवावे लागले आहेत. त्यामुळे घरातील सर्वच मंडळी सध्या बेरोजगार झाली आहेत. कोरोनाचे संकट कधी जाणार, याकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मुंबईच्या धर्तीवर मायक्रो कन्टेटंमेंट झोन करण्यात यावेत. यामुळे कांही यंत्रमाग कारखाने सुरु होण्यास मदत होईल. याबाबत जिल्हा प्रशासनानने ठोस निर्णय घ्यावा. 
- विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना 

दृष्टिक्षेप 
- कंटेन्मेंट झोनमुळे कोणताही उद्योग सुरू करता येत नाही 
- दाट वस्तीतही उद्योगाचे जाळे 
- सातशे ते आठशे यंत्रमाग उद्योग बंद 
- हजारो कामगार झालेत बेरोजगार 
- उद्योग सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता 

 

संपादन :प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 36 containment zones in Ichalkaranji