आवड असली की सवड मिळतेच, कोल्हापूरात फ्लॅटमध्येच लावली ५५० झाडे

आकाश खांडके
Saturday, 26 September 2020

अपर्णा कुलकर्णी यांच्‍याकडे स्नेक प्लॅंटच्या आठ प्रजाती

रमणमळा (कोल्हापूर) : नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या अपर्णा संतोष कुलकर्णी यांना झाडांबद्दल विशेष आकर्षण आहे. या आकर्षणापोटी त्यांनी राहत्या फ्लॅटमध्ये ५५० झाडांची लागवड केली आहे. यात इनडोअर, सेमी शेड व आउटडोअर अशा विविध प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. आई व भावाचा वृक्ष लागवडीचा छंद त्यांनी जोपासला आहे. त्यांनी स्वतःची नर्सरी सुरू केली असून, झाडांच्या सानिध्यात राहिल्याने कायम प्रसन्न वाटते, अशी त्यांची भावना आहे.

हेही वाचा - जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूरात राबवलेल्या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक  

कुलकर्णी या अभियंता आहेत. नोकरी बंद केल्यानंतर त्यांनी छंद जोपासण्याकडे लक्ष दिले. देशाच्या विविध भागातून गोळा केलेली साडे पाचशे झाडं त्यांच्या घरात आहेत. यामध्ये प्रमुख्याने वेली व झुडूपांचा समावेश आहे. स्नेक प्लॅंट, झामिया, ग्रीन वाईन, स्पायडर लिली ही  ऑक्‍सिजन प्लॅंट झाडं त्यांनी घराच्या मुख्य खोलीत वाढवली आहेत. घराच्या विविध जागेत तिथे साजेशी झाडं लावली आहेत.

स्नेक प्लॅंटच्या सोळा प्रजाती पैकी आठ त्यांनी घरी वाढवल्या आहेत. सेन्सिवेरीया ओलावा शोषून घेत असल्याने ते बाथरूममध्ये ठेवले आहे. स्वयंपाकघरात वेलींची लागवड केली आहे. सूर्य प्रकाशात वाढणारी झाडं टेरेस व खिडकीत लावली आहेत. मागील ११ वर्षांपासून ती त्यांच्या घरात आहेत. यातील काही कोल्हापूरमध्ये उपलब्ध आहेत तर काही आंध्र प्रदेश, उटी, बंगळूरवरून आणली आहेत. 

"दरवर्षी मी कुटुंबाबरोबर फिरायला जाते, तेव्हा तेथील महत्त्वाची झाडे मी बरोबर घेऊन येते. कुटुंबातील सर्वांना झाडांची आवड आहे. मध्यंतरी आम्ही फ्लॅटमध्ये स्थायिक झालो. ५५० झाडे सहाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आणताना सर्वांची तारांबळ उडाली. जागेच्या अभावामुळे नवीन झाडे ठेवायला अडचण होत आहे."

- अपर्णा कुलकर्णी

हेही वाचा - ज्येष्ठांना इशारा ः कोरोनाबाधितांच्या मृत्यूंमध्ये 90 टक्के वयोवृद्ध

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 550 small plantation in our flat aparna kulkarni' s work in kolhapur