धक्कादायक; 64 लाखांच्या दागिन्यांना चुना ; विक्रीच्या बहाण्याने कृत्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

सोने-चांदीच्या दागिन्यांचा लक्षतिर्थ येथील दोघा व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली

कोल्हापूर -  विक्रीच्या बहाण्याने 64 लाखांहून अधिकच्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा लक्षतिर्थ येथील दोघा व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली. याप्रकरणी हुपरीतील संशयितावर गुन्हा दाखल झाला. श्रीकांत ऊर्फ अमित तवन्नाप्पा कांते (वय 37, रा. हुपरी, ता. हातकणंगले) असे संशयिताचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, दत्तात्रय दिनकर म्हसवेकर हे यशोदा विश्‍वास कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत येथे राहतात. त्यांचा सोने-चांदीचे दागिने तयार करणे, मजुरीवर करून देण्याचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर या भागातील सुभाष शिंदे हे चांदी व्यवसायिक आहेत. ते चांदीच्या मूर्ती तयार करतात. या दोघांच्या संपर्कात संशयित श्रीकांत ऊर्फ अमित कांते हा आला. त्याने म्हसवेकर व शिंदे यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर 12 मार्च ते 12 ऑगस्ट 2020 दरम्यान म्हसवेकर यांच्याकडून विक्रीसाठी म्हणून 42 लाख 45 हजार 39 रूपये सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. त्याचबरोबर सुभाष शिंदे यांच्याकडून त्याने 21 लाख 41 हजार 820 रूपये किमंतीचे 35 किलो 697 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या मूर्ती, मुकूट असा ऐवज विक्रीसाठी घेतला. पण त्याबदल्यात त्याने त्याबदल्यात त्याची रोख स्वरूपात रक्कम दिली नाही की घेतलेले दागिने, चांदीचा ऐवज परत दिला नाही.

हे पण वाचास्वाभिमानीची ऊस परिषद होणार ऑनलाईन

त्याने आपली फसवणूक केली असल्याची फिर्याद म्हसवेकर यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार संशयित श्रीकांत ऊर्फ अमित कांतेवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वाडकर करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 64 lakh jewellery scam in kolhapur