मोठी बातमी ; कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; आज सर्वाधिक रूग्णांची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

उपचाराअभावी अत्यवस्थ रुग्णांचे शहरात हाल सुरूच असून, प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणाही कोलमडून पडल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर  - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर आजही कायम असून आज दिवसभरात याआधीपेक्षा सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज तब्बल ७०२ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या आठ हजार ९२९ वर पोहोचली आहे तर आजअखेर कोरोनामुळे जिल्ह्यातील २१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 
उपचाराअभावी रुग्णांचे हाल सुरूच

दरम्यान, उपचाराअभावी अत्यवस्थ रुग्णांचे शहरात हाल सुरूच असून, प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणाही कोलमडून पडल्याचे चित्र आहे. रुग्णाला घेऊन आल्यानंतर त्याला दाखल करून घेतले जात नसल्याने नातेवाइकांची ससेहोलपट होतेच, पण त्यातून रुग्णालय प्रशासन आणि नातेवाइकांच्यात वादाचा प्रसंग ठरलेले आहेत. केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने एका नगरसेवकांसह चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच एका डॉक्‍टरसह एका सामाजिक कार्यकर्त्यांचा याच कारणामुळे मृत्यू झाला. 

दरम्यान, इतर आजार असल्याने पण सिटी स्कॅन अहवालामध्ये कोरोनाची लक्षणे दिसलेल्या रुग्णांना दाखल करताना नातेवाइकांचे हाल होत आहेत. अशा रुग्णांसाठी ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेल्या बेडची संख्या शहरात कमी आहेत, ही सुविधा असलेले बेड पूर्ण भरलेले आहेत, अशा परिस्थितीत या रुग्णांना दाखल करून घेण्यास सरकारी आणि खासगी रुग्णालयेही असमर्थ असल्याने यामुळेच काहींची जीव जात आहे. 

शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) संपूर्ण कोरोनाग्रस्तांवरील उपचारासाठी राखीव आहे. शहरातील २७ खासगी रुग्णालयातील काही बेडही अधिग्रहीत केले आहेत. सीपीआरमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्‍सिजनची सुविधा असलेले बेड मिळत नाहीत. अशीच स्थिती खासगी रुग्णालयांमध्ये आहे. खासगी रुग्णालयात तर रुग्णाला आतही घेतले जात नाही. तीन दिवसांपूर्वीच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर रुग्णांना पहिल्यांदा दाखल करून घेऊन उपचार करा, असे आदेश देऊनही प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांत उपचाराअभावी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपावरून हे स्पष्ट होत आहे. 

सुभाषनगर आणि परिसरात गेल्या ४५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्‍टरांचाही याच कारणाने मृत्यू झाला. त्यात त्यांच्या मुलाचा डेंगीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पत्नीला पतीचे निधन झाल्याची माहिती नाही; पण अजूनही या डॉक्‍टरांचा कोरोनाचा अहवाल आलेला नाही. आज एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचाही वेळेत बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. अशा घटना वाढत असताना आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाकडून मात्र कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. 

हे पण वाचा मोठी बातमी ; कोल्हापुरात कोरोनाचा कहर सुरूच ; आज सर्वाधिक रूग्णांची नोंद 
 
सीपीआरमध्ये वर्गवारीची गरज
सीपीआर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आजाराच्या गंभीर स्वरूपावरून वर्गवारी करण्याची गरज आहे. ज्यांना इतर आजार आहेत आणि ऑक्‍सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे, त्यांना तातडीने त्या सुविधा देणे यामुळे शक्‍य होणार आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांना ‘होम क्वॉरंटाईन’ केल्यास सीपीआरमधील काही बेड मिळू शकतील, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 702 new corona positive patient in kolhapur district