Video - बाप हा बापच असतो...! मुलाच्या मृत्यूनंतर 91 व्या वर्षी पुन्हा उभा ठाकला लढायला

91 year old father start work after son death
91 year old father start work after son death

कोल्हापूर - सत्तरचं दशक. शिवाजी उद्यमनगरात त्यांनी कवडे इंजिनिअर्स वर्क्‍स, कवडे आयर्न वर्क्‍सची स्थापना केली आणि या क्षेत्रात विविध प्रयोग सुरू केले. विविध मशिन्ससाठी, शेती अवजारांसाठी लागणाऱ्या पुलीज्‌ त्यांच्या या कारखान्यात तयार होऊ लागल्या आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर निम्म्याहून अधिक देशांत त्या जाऊ लागल्या. पुढे त्यांनी स्वतः येथून निवृत्ती घेतली. हा सारा व्याप आपल्या एकुलत्या एक राजेंद्र या मुलाकडे सोपवला आणि केवळ कोष्टी समाजासाठी नव्हे, तर सर्वच समाजघटकांसाठी स्वतःला वाहून घेतले. मात्र, नुकतेच त्यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले आणि त्याचे उत्तरकार्य होताच मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला सारून पुन्हा हा माणूस कारखान्यात आला.

मालकपणाचा कुठलाही लवलेश मनात न ठेवता स्वतः मशिनवर उभा राहिला. कारखान्यातील पॅटर्नपासून ते अगदी सर्व व्यवहारात पहिल्यासारखेच लक्ष घालू लागला. या जिद्दी माणसाचं नाव आहे, ज्येष्ठ उद्योजक बळीराम कवडे आणि त्यांचे वय आहे अवघे 91! गोपालकृष्ण मंदिरापासून पुढे उद्यमनगरात प्रवेश केला, की चौथी किंवा पाचवी फर्म लागते ती श्री. कवडे यांचीच. त्यांचा हा कारखाना आजवर अनेकांसाठी आधारवड ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी कारखाना सुरू केला.

कारखान्यात लागणारे विविध पॅटर्न असोत किंवा तयार झालेले पार्ट बाहेर पाठवण्याचे प्लॅनिंग; या साऱ्या गोष्टी तेच स्वतः करायचे. झपाटून काम करत या क्षेत्रात त्यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटवला. त्यांच्या या उद्यमशीलतेला सलाम करताना अनेक पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला. मात्र, पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी कारखान्यातून निवृत्त होत समाजासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. येथील कोष्टी समाजाचे ते सलग पंधरा वर्षे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच कारकीर्दीत मंगळवार पेठेतील चौंडेश्‍वरी हॉल उभा राहिला. हॉलच्या बांधकामासाठी स्वतः त्यांनी पहिल्यांदा आपल्याकडील भरीव रक्कम जमा केली. आज हाच हॉल केवळ कोष्टी समाजच नव्हे, तर सर्वच समाजघटकांसाठी उपयुक्त ठरतो आहे. बळीराम कवडे चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने ट्रस्टही काढला आणि त्या माध्यमातून समाजातील गरजू मुलांना शिष्यवृत्ती, शालेय साहित्य वाटप असो किंवा वैद्यकीय मदतीसाठी ते आजही कार्यरत आहेत. 

व्हिडिओ पाहा - 

रडताय कसले? 
सध्या कोरोनामुळे सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. रोज एकेक धक्का अनेकांना पचवावा लागतो आहे. मात्र, श्री. कवडे यांच्यातील खमकेपणा आणि त्यासाठीचे "पॉझिटिव्ह थिंकिंग' साऱ्यांनाच प्रेरणा देणारे ठरते आहे. त्यांच्या एकूणच कामाचा आवाका आणि कार्यपद्धती पाहिली, की "रडताय कसले? कितीही संकटे आली तरी जमिनीवर पाय घट्ट रोवून लढायला शिका...' असाच संदेश त्यातून मिळतो. दरम्यान, सध्या ते कारखान्यात नातू रोहन आणि पार्थ यांना उद्यमशीलतेचे धडे देत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com