
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील आमशी येथे घरोघरी मल्ल आहेत. तब्बल चार पिढ्यांची ही परंपरा आहे. आमशी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात मल्लांचा गाव व कुस्ती कलेची पंढरी म्हणून ओळखले जाते. कुस्तीत करिअर करीत 52 मल्लांनी सरकारी नोकरी मिळवून कुस्तीबाबतचे गैरसमज खोडून काढले आहेत. कुस्तीसाठी स्वतःची 12 गुंठे जमीन आणि निवृत्तीवेतनाचे पैसे देणारे दानशूर व्यक्तिमत्त्वही येथेच भेटते.
आमशी गाव चार हजार लोकसंख्येचं गाव, मल्लविद्येत रंगून गेलंलं. येथे घरोघरी मल्ल आहेत. पहाटेपासून येथे शड्डू घुमतो. महाराष्ट्रात प्रत्येक मैदानात आमशीचा एक तरी मल्ल खेळतोच. गावामध्ये दोन हनुमान तालमी असून सहा वर्षांपासूनच्या मुलांना येथे कुस्तीचे धडे दिले जातात. अनेक गावांना लाखोंचा निधी तालीम बांधण्यासाठी दिला जातो. या उलट येथे व्यायामशाळा किंवा तालमीला कवडीही मिळालेली नाही. प्रतिकूल परिस्थितीतही गावातील 12 मुली आणि सुमारे 240 लहान-मोठी मुले आज कुस्तीत करिअर घडवीत आहेत.
हेही वाचा- पोलिसांची पदकांची पाटी यंदा कोरीच -
येथील छोट्या कुस्ती विश्वाला साधारणतः 2010 मध्ये काहीशी मरगळ आली होती. अशावेळी गावातील हरी बापू पाटील यांनी 2012 मध्ये स्वतःची 12 गुंठे जमीन आखाड्याला मोफत दिली व येथे मल्लांना मोफत प्रशिक्षण दिले जाऊ लागले. यावर न थांबता त्यांनी स्वतःच्या निवृत्तीवेतनाचे आठ लाख देऊन साई संकुल कुस्ती आखाडा बांधला. येथे सुमारे शंभर मुले व दहा मुली कुस्ती विद्येचे धडे गिरवीत आहेत. त्यांच्या खुराकापोटी वर्षाला सुमारे 35 ते 36 लाख रुपये खर्च येतो. हा भार फक्त मल्लांच्या पालकांवर न टाकता ग्रामस्थही सढळ हाताने मदत करतात.
आई-वडील पोटाला चिमटा काढून मुलांना पैसे पुरवतात. अशा परिस्थितीत नवोदित मल्ल कुस्तीचा सराव करताना दिसतात. सध्या येथे कर्नाटक, पुणे, सांगली, रायगड, कर्जत, इंदापूर येथील एकूण दहा मल्ल कुस्तीचे धडे गिरवीत आहेत. वस्ताद संदीप पाटील, राजाराम पाटील, निखिल पाटील, नितीन पाटील या मल्लांना विनामोबदला मार्गदर्शन करतात.
शालेय तालुका कुस्ती स्पर्धेत गावातील 21 मल्लांची निवड झाली. त्यांतील दहाजण जिल्हा स्पर्धेत खेळले. त्यातून सातजणांची विभागीय, तर पाचजणांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली. यातील योगेश पाटील आणि .... राष्ट्रीय शालेय स्पर्धेत उतरले होते. कुस्तीत विकास पाटील, उत्तम पाटील, शरद पाटील, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी कृष्णात पाटील यांनी करवीर केसरी, महापौर केसरी गदा पटकाविल्या आहेत. पुढे यांतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक झालेले उत्तम पाटील, सुनील पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी भगवान पाटील पुणे, मुंबईसह अन्य मोठ्या शहरांत कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.
येथे पहाटेपासून कुस्तीचा शड्डू घुमत असतो; मात्र कुस्ती कलेला प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सढळ हाताने मदत केलेली नाही. गळती लागलेल्या छपराखाली ही मुलं कुस्तीचा सराव करतात. दूध आहे, तर फळे नाहीत; फळे आहेत, तर बदाम नाहीत अशी अवस्था आहे. गावात सुसज्ज व्यायामशाळा आणि आखाडे नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत गावाने कुस्ती जोपासली आहे.
कुस्तीनंतर करिअरही
कुस्तीत करिअर करत गावातील 52 तरुणांनी शासकीय सेवेत स्थान मिळविले आहे. गावातील 30 मल्ल सैन्यदलात तर 22 जण पोलिस दलात विविध पदांवर आहेत. 22 मल्ल पोस्ट, वनखात्यासह विविध खासगी संस्थांत सेवा बजावत आहेत.
माझे कुस्तीवर प्रेम आहे. त्या प्रेमातूनच आखाडा सुरू केला. त्यातून मल्लांचे करिअर झाले. तरुणही व्यसनांपासून दूर राहिले.
-हरी बापू पाटील, कुस्ती मार्गदर्शक
माझ्या दोन्ही मुली विश्रांती व रेखा कुस्ती खेळतात. विश्रांती ऑलम्पिक खेळेल, अशी तयारी सुरू आहे. विश्रांतीची कुस्ती पाहून अभिनेता आमिर खान खूश झाला होता. त्याने दोन वर्षांपूर्वीच तिला दंगल चित्रपटाच्या प्रमोशनल शोसाठी बोलावून घेतले होते. त्यावेळी तिचा गदा देऊन सत्कारही केला होता.
-भगवान पाटील, माजी सैनिक
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.